मुंबई, पुण्यातील तरुणांच्या नक्षलवादी चळवळीतील सहभागावरून भिन्न मतप्रवाह असले, तरी या शहरांतील अनेक तरुणांना नक्षलवाद्यांसोबत सक्रियतेने काम करताना पाहिलेला दुवाच पोलिसांच्या हाती सापडला आहे. काही दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या जहाल नक्षलवादी गोपीने या तरुणांसोबत काम केले असून या सर्वाच्या जंगलातील सक्रियतेचा वृत्तांत त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात कथन केला आहे.
मूळचा गडचिरोली जिल्ह्य़ातील कोरचीचा असलेल्या गोपीने पोलिसांना दिलेली माहिती धक्कादायक व पुणे, मुंबईत सक्रिय असलेल्या काही संघटनांच्या नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकणारी आहे. गेली १५ वर्षे गडचिरोली, गोंदिया, बालाघाट व राजनांदगाव या जिल्ह्य़ात कमांडर असलेला गोपी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा राज्यातला एकमेव सदस्य मिलिंद तेलतुंबडे ऊर्फ दीपकच्या मार्गदर्शनाखाली हिंसक कारवाया करीत होता. याच दीपकच्या माध्यमातून मुंबई, पुण्यातील अनेक संघटना व त्यात काम करणारे तरुण चळवळीत आले, असे गोपीने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
गोपीच्या म्हणण्यानुसार सध्या पुण्याचा संतोष शेलार हा तरुण चळवळीत ‘विश्व’ या नावाने सक्रिय आहे. सध्या प्लॉटून क्रमांक ५३ मध्ये असलेला विश्व ‘पेंटर’ या नावानेही ओळखला जातो. मिलिंद तेलतुंबडेला केंद्रीय समितीत घेण्यात आल्यानंतर विश्व त्याला अबूजमाडमध्ये सोडण्यासाठी गेला. पुण्याचाच प्रशांत कांबळे हा तरुण चळवळीत लॅपटॉप ऊर्फ मधुकर या नावाने ओळखला जातो. तो संगणक, मोबाइल दुरुस्त करण्यात तरबेज आहे. हे दोघेही कबीर कला मंचचे सदस्य आहेत. याशिवाय, सध्या उत्तर गडचिरोलीच्या विभागीय समितीचा सदस्य असलेला विकास नागपुरे हाही मुंबई व नागपुरात राहिलेला आहे. त्यानेच अनेकदा तेथील वास्तव्याच्या आठवणींना उजाळा दिला, असेही गोपीचे म्हणणे आहे.
म्हणणे खरे..
अनेक गुन्हे दाखल असलेला गोपी ऊर्फ निरंगसाय मडावी स्वत:हून शरण आला आहे. त्याच्यावर जबाबासाठी कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे तो जे सांगत आहे ते खरे आहे. त्यामुळे या तरुणांच्या निरपराधित्वासाठी कैवार घेणाऱ्यांनी आता तरी सावध झाले पाहिजे, असे मत नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.