गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजतो आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने सरकार पातळीवर उपसमितीमार्फत चर्चा सुरू आहे. त्यामुळे सरकारने आता विशेध अधिवेशन बोलवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली असून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळल्याच्या चर्चा, उपोषणाच्या सातव्या दिवशी फोन कॉल, मनोज जरांगे म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटलांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली. दोघांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मुद्द्यावर २४ मिनिटे चर्चा झाली. यावर मनोज जरांगेंनी भाष्य केलं. याबाबत माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवर आरक्षणावरच चर्चा झाली. दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. त्या समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं.

“मराठा समितीला राज्याचा दर्जा घ्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊही नका, असं मी स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही आमची बैठक बोलावली आहे. आम्हीही त्यावर चर्चा करणार आहोत. कुणबी आणि मराठा एकच असल्याचा २००४ चा जीआर आहे. त्यामुळे जीआर दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत,” असंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “आमदार-खासदारांनो मुंबई सोडू नका, गट तयार करा, मुख्यमंत्र्यांचे पाय पकडून…”, मनोज जरांगेंचं आवाहन

मराठा समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही

“आमदार -खासदार राजीनामा का देत आहेत हे कळत नाही. राजीनामा देण्यामागचा फायदा-तोटा मला कळत नाही. पण मी सर्व आमदार-खासदारांना सांगतो की तुम्ही मुंबईतच थांबा. आरक्षण मिळाल्याशिवाय यांचा पिच्छा सोडू नका. आम्ही काय इथून हटत नाही. सर्व आमदार-खासदार, माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी प्रचंड मोठा गट तयार करावा. मुंबई सोडायची नाही. मंत्रायल आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दारं सोडायची नाहीत. त्यांचे पाय पकडून त्यांच्या मागे लागायचं. सरकारला अधिवेशन घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरा. मराठा समाज यांना कधीच विसरणार नाही असा शब्द देतो”, असं आश्वासनही मनोज जरांगेंनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urgently convene a special session and manoj jarange requests the government said half reservation sgk
Show comments