उरमोडी योजनेचे पाणी माण तालुक्याच्या अंगणात आले असून, या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा साक्षीदार होताना मला हजारो माणदेशी डोळय़ांमध्ये आनंदाश्रू दिसत असल्याचे समाधान व्यक्त करताना, आता जिहे-कटापूरचे पाणी खटाव-माण तालुक्यात आणणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. अंथरूण न पाहता पाय पसरल्यानेच जलसिंचनात आपण अडचणीत आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
माण तालुक्यातील किरकसाल येथे उरमोडी योजनेच्या पाण्याचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाचे निमंत्रक माणचे आमदार जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर, हिंदुराव निंबाळकर, रणजितसिंह देशमुख, भगवानराव गोरे, सानिया गोरे, विजय सिन्हा, हरिभाऊ जगदाळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळे आजचा सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी जमलेला जनसमुदाय माणदेशातील जलक्रांतीची नांदी ठरणार आहे. उरमोडी योजनेसाठी जयकुमार गोरे यांनी आव्हान स्वीकारून अधिकाऱ्यांकडून वेळेत कामे करून घेतली. तरीही काही संकुचित वृत्तींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माणदेशी जनता जागा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंचनासाठी केवळ ८ हजार कोटींची तरतूद असून, जे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, जेथे टंचाईची तीव्रता अधिक आहे, अशा प्रकल्पांना पाण्याची गरज हाच निकष लावून प्राधान्यक्रमाने पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पाणीटंचाईच्या तालुक्यांचा विचार करूनच सिंचननिधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे. अंथरूण न पाहता पाय पसरल्याने सिंचनक्षेत्र अडचणीत आले, मात्र त्यातूनही मार्ग काढत महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी दिला गेला आहे.
आता, खटाव तालुक्याील औंधसह १६ गावांचा उरमोडी, कलेढोणसह परिसरातील गावे आणि कुकुडवाडसह १४ गावांचा समावेश टेंभू योजनेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माण तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, पण जनतेनेही कामे करणाऱ्यांची पाठराखण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जयकुमार गोरे म्हणाले, की आज माणदेशात गावोगावी गुढय़ा उभारून उरमोडीच्या पाण्याचे सहर्ष स्वागत झाले. अखेर उरमोडीचे पाणी आणलेच, आता मिशन जिहे-कटापूर हाती घेणार आहे. २५ वष्रे तालुक्याची सत्ता उपभोगणारे आज पाच वर्षांची मापे काढत आहेत. मी पेरायचे काम केले, पण एखादे बी खराब लागतेच. आमच्या हक्काचे ६.५४ टीएमसी पाणी आम्ही घेणारच. आज सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि जनतेच्या ताकदीवरच ही लढाई यशस्वी केली. माणदेशी जनतेला ताठ मानेने, स्वाभिमानाने उभे करायचे होते. दुष्काळाचा कलंक पुसायचा होता. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हाच माणमध्ये जलक्रांतीची चाहूल लागली होती. गेल्या चार वर्षांत त्यांनी उरमोडी, जिहे-कटापूर, तारळी योजनांसाठी ९५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
उरमोडी योजनेचे पाणी माणदेशच्या अंगणात खळखळले
उरमोडी योजनेचे पाणी माण तालुक्याच्या अंगणात आले असून, या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा साक्षीदार होताना मला हजारो माणदेशी डोळय़ांमध्ये आनंदाश्रू दिसत असल्याचे समाधान व्यक्त करताना, आता जिहे-कटापूरचे पाणी खटाव-माण तालुक्यात आणणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
First published on: 26-08-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmodi scheme water release to mandesh