US Donald Trump Big Decision after Days After clash with Zelensky : रशिया व युक्रेनदरम्यान चालू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा ठेवून अमेरिकेला गेलेल्या युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना प्रत्यक्षात जाहीर दमदाटीला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी चर्चा अर्धवट सोडली. तसेच अमेरिका, व्हाइट हाऊस व अमेरिकन जनतेचे जाहीर आभार मानून तेथील उर्वरित कार्यक्रम रद्द करून निघून जाणे पसंत केले. ट्रम्प दमदाटी करत असताना झेलेन्स्की यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, ट्रम्प-झेलेन्स्की वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या वादानंतर मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून युक्रेनला रशियाविरोधात जी लष्करी मदत दिली जात होती ती मदत ट्रम्प यांनी रोखली आहे. ट्रम्प यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. हे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत.

व्हाईट हाऊसमधील (अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय तथा निवासस्थान) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की झेलेन्स्की यांना शांतता हवी आहे याची ट्रम्प यांना खात्री होत नाही तोवर ही मदत बंद राहील. या अधिकाऱ्याने त्याची ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, युक्रेनला आमच्याकडून मिळणारी मदत थांबवण्याच्या निर्णयानंतर आम्ही त्या निर्णयाच्या परिणामांवर व रशिया-युक्रेनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. झेलेन्स्की यांच्या ट्रम्प यांच्याबरोबरच्या वादाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर एक अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीची शस्त्रास्र व दारुगोळ्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

दुसऱ्या बाजूला झेलेन्स्की यांचं म्हणणं आहे की त्यांना सुरक्षेची खात्री हवी आहे. यापूर्वी झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं की सध्या उभय देशांमधील जी परिस्थिती आहे ती पाहता असं वाटत नाही की ये युद्ध लवकर थांबेल. यावर ट्रम्प म्हणाले की, झेलेन्स्की यांचं हे वक्तव्य चुकीच असून मी त्याची निंदा करतो.

व्हाइट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर झेलेन्स्की यांच्या पोस्टने वेधलं लक्ष

व्हाइट हाऊस सोडल्यांतर काहीच मिनिटांमध्ये झेलेन्स्की यांनी एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की ‘‘धन्यवाद अमेरिका, तुमच्या पाठिंब्यासाठी, या भेटीसाठी आभार. अमेरिकेचे अध्यक्ष, काँग्रेस आणि अमेरिकी जनतेचे आभार. युक्रेनला केवळ शांतता हवी आहे आणि आम्ही त्यासाठीच प्रयत्न करत आहोत.’’

Story img Loader