Nilam Shinde Accident News: साताऱ्यातील विद्यार्थिनी नीलम शिंदे अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेली होती. १४ फेब्रुवारी रोजी व्यायामासाठी जात असताना एका वाहनाने तिला मागून जोरदार धडक दिली, ज्यात ती गंभीर जखमी झाली असून तेव्हापासून कोमामध्ये आहे. १६ फेब्रुवारी रोजी नीलम शिंदेच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती मिळाली. तेव्हापासून ते अमेरिकेत जाता यावे, यासाठी व्हिसासाठी अर्ज करत होते. मात्र ११ दिवस त्यांना काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर काल माध्यमांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही पुढाऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अखेर अमेरिकन दूतावासाने नीलम शिंदेचे वडील तानाजी शिंदे आणि दोन भावांना व्हिसा मंजूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीलम शिंदेचा चुलत भाऊ याने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, “व्हिसासाठी मुलाखतीची प्रक्रिया अगदी जलद आणि सुरळीत झाली. व्हिसाची प्रिंटही आम्हाला मिळाली आहे. आता आम्ही पुढची फ्लाईट पकडून अमेरिकेला निघत आहोत. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माध्यमांचे खूप खूप आभारी आहोत.”

गौरव कदमने पुढे सांगितले की, अमेरिकेत जाण्यासाठी आम्ही ५ ते ६ लाखांचे कर्ज काढले आहे. जर सरकारने काही आर्थिक मदत दिली तर आम्हाला बरेच वाटेल. सध्या तिकडे रुग्णालयाचा किती खर्च झाला, याचीही अद्याप आम्हाला कल्पना नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना नीलमचे वडील तानाजी शिंदे म्हणाले, “खूप प्रयत्न केल्यानंतर आता आमचा व्हिसा मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील अनेकांनी आम्हाला यासाठी मदत केली.” यावेळी नीलमच्या भावाने सांगितले की, ताशी १२० किमीच्या वेगाने येणाऱ्या वाहनाने तिला मागून जोरदार धडक दिली. यात हात-पाय आणि डोक्याला जबर मार लागल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. दोन सर्जरी केल्यानंतरही रक्तस्त्राव थांबत नव्हता. तिच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी आम्हाला तपशील कळवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे ओएसडी आमच्या संपर्कात होते. त्यामुळे आम्हाला व्हिसा मिळण्यात मदत झाली.

वाहन चालकाला अटक

नीलम शिंदेला जोरदार धडक देऊन जखमी करणाऱ्या वाहन चालकाला कॅलिफोर्निया पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी लॉरेन्स गॅलो (५८) याला अपघाताच्या पाच दिवसानंतर १९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us embassy grants visa to family of indian student nilam shinde in coma after accident kvg