ऊसदरासाठीचे आंदोलन संयमाने व्हावे. मात्र आंदोलनात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस योग्य त्या बळाचा वापर करतील, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी शनिवारी पत्रकार बठकीत केले. ऊस उत्पादकांना रास्त दर मिळालाच पाहिजे यासाठी साखर कारखान्यांनीच पुढाकार घेऊन लवकरात लवकर दर घोषित करावा असे आवाहनही त्यांनी केले.
ऊसदरासाठी हंगामपूर्व आंदोलन हा एक अलीकडच्या काळातील ट्रेंड बनत चालला असून, आंदोलनामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार होत असतात. साखर कारखानदार आणि आंदोलक यांच्यात समन्वयाने चर्चा करून निर्णय व्हायला हवा. ज्या त्या क्षेत्रातील साखर कारखान्यांनी शेतकरी सभासदांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून दर तातडीने घोषित करावेत. साखर कारखान्यावरील कर्ज, कार्यक्षेत्रातील उपलब्ध ऊस, वाहतुकीचे अंतर या वेगवेगळय़ा पातळींवर ऊसदराचा विचार करून साखर कारखानदारांनी उत्पादकांना दिलासा देण्याचे काम करावे असे आवाहन पाटील यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे केली असून, मंत्री व पुढा-यांची घरे पेटवू अशी चिथावणीखोर भाषा या परिषदेत वापरण्यात आली. या सर्व भाषणांचा संबंधित यंत्रणा मागोवा घेत असल्याचे सांगत पाटील म्हणाले, की पोलिसांच्या गोळय़ा शेतक-यांसाठी नसून सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आहेत. आंदोलकांना न्याय्य हक्कासाठी आंदोलन करण्याचा लोकशाहीने अधिकार दिला आहे. तथापि, सर्वसामान्यांना वेठीस धरल्याने रास्ता रोकोसारखे आंदोलन केल्याने स्थिती चिघळू शकते. एखादा अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यास विलंब लागल्याने गंभीर स्थिती उद्भवू शकते. शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत वेळेत पोहोचू शकत नाही. या बाबी लक्षात घेऊन आंदोलन संयमाने करावे. मात्र आंदोलनाच्या नावाखाली ट्रॅक्टरचे टायर फोडणे, नासधूस करणे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. कायदा हातात घेणा-यांना बळाचा वापर करून प्रतिबंध केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
ऊस उत्पादकाच्या संमतीने उसाची तोड जर सुरू असेल आणि ऊसगाळपाची साखर कारखान्याची तयारी असेल तर त्यांना संरक्षण देण्याची शासनाची जबाबदारी आहे. मात्र त्रयस्त संघटना अथवा व्यक्तींनी या आंदोलनाची झळ सनदशीर मार्गाने कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बसणार नाही याची खबरदारी घ्यावी. गेल्या वर्षी ऊस आंदोलनावेळी वसगडे येथील चंद्रकांत नलवडे या शेतकऱ्याचा गोळीबारात मृत्यू झाला. त्याचा अद्याप अहवाल गृहविभागाल प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. इंदापूर येथील शेतकऱ्याचा मृत्यू टायर फोडत असताना झालेल्या हवेच्या स्फोटाने झाला असल्याचे सांगून गृहमंत्री पाटील म्हणाले, की पोलिसांच्या गोळय़ा झेलण्याची तयारी शेतकरी आंदोलकांची असली तरी पोलिसांच्या गोळय़ा या आंदोलकांवर वापरण्यासाठी नसून सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहेत.
ऊसदरासाठी साखर कारखानदार सरकारकडे निर्देश करीत असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय उत्पादक आणि कारखानदार यांनी चच्रेने घ्यायचा असून, साखर उद्योग नियंत्रण मुक्त करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. सहकार विभाग केवळ मार्गदर्शन देऊ शकते. मात्र दराबाबतचा निर्णय सहकार विभागाला घेता येणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
साखर घोटाळय़ाची चौकशी
साखर कारखारदार आणि व्यापारी यांनी साखर विक्रीमध्ये ७०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणाची सी.आय.डी. चौकशी करण्याची तयारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दर्शवली. याबाबतचे पुरावे संघटनेच्या नेत्यांनी तयार ठेवावेत. सी.आय.डी.चे वरिष्ठ अधिकारी नेत्यांच्या घरी जाऊन पुरावे जमा करतील, असेही त्यांनी सांगितले. साखरदराबाबत संगनमत करून साखरेचे दर पाडल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. या व्यवहारात ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शेट्टींनी करताच कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशीचे पत्र आपणाला दिले असून, राज्याचा गुप्तचर विभाग साखर घोटाळय़ाची चौकशी निष्पक्षपाती करेल. यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा