वाई : किल्ले प्रतापगडावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाच्या पुनर्बांधणीत दगडाऐवजी चक्क कडप्प्याचा वापर होत आहे. यामुळे शिवप्रेमी आणि प्रतापगड ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पुरातत्त्व विभागाने हे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांनी कामच बंद पाडले आहे.
किल्ले प्रतापगडचा जागतिक वारसा स्थळांच्या नामांकन यादीमध्ये नुकताच समावेश झाला आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडावर होणारी सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून होण्याची गरज असताना किल्ले प्रतापगडचा समावेश केंद्र व राज्य संरक्षित स्थळांच्या यादीमध्ये नसल्याने निधीअभावी काम रखडलेले होते. पडझड झालेल्या ध्वज बुरुजाचे काम मागील दोन वर्षांपासून ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून करण्यात येत होते.
आणखी वाचा-“बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष…”, मनसेचा अजित पवारांना टोला
किल्ल्यावरील बांधकामाला ३६८ वर्ष झाली. यामुळे किल्ल्यावरील तटबंदी, बुरुज, बांधकाम पावसात भिजून व हवामानातील बदलामुळे ढासळत आहे. दोन वर्षांपूर्वी ध्वज बुरुजाचा काही भाग ढासळला. या कामासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने परवानगी घेत खासगी ठेकेदाराकडून काम सुरू केले. जुन्या दुर्मीळ कामाचा अनुभव नसल्याने या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम केले जात होते. याबाबत ग्रामस्थांकडून या संस्थेकडे तक्रारी करण्यात येत होत्या. मागील दोन वर्षांपासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.
ध्वज बुरुजाच्या दुरुस्तीचाच एक भाग सिमेंट काँक्रीटमध्ये करण्यात आला होता. सिमेंटच्या गिलाव्यामुळे संपूर्ण किल्ल्याची व बुरुजाची शोभा जात होती. हे काम झाकण्यासाठी दगडाचा वापर करणे गरजेचे असताना दगड न वापरता चक्क कडप्पा फरशीचा वापर करण्यात आला असल्याने ग्रामस्थ तसेच शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. मागील काही वर्षांपूर्वी देखील याच ठेकेदाराकडून असेच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्या कामामध्ये चक्क थर्माकोलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यामुळे यापूर्वी केलेल्या कामाची देखील चौकशी व तपासणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व शिवप्रेमींकडून होत आहे.
आणखी वाचा-राज्यातील पाच हजार एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
या कामाला विरोध वाढत असल्याने काम बंद करण्याचा सूचना पुरातत्त्व विभागाने दिल्या आहेत. त्यानंतर काम बंद करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदारावर सह्याद्री प्रतिष्ठानने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी प्रतापगडाची एका बाजूची तटबंदी ढासळल्यानंतर ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ने त्या परिसरात दुरुस्ती केली होती. तोपर्यंत ध्वज बुरुज ढासळला. त्या परिसरातही दुरुस्तीचे काम लोकवर्गणीतून या संस्थेने सुरू केले होते. परंतु वारसा स्थळाच्या अनुषंगाने काम होत नसल्याने व ग्रामस्थ आणि शिवप्रेमींच्या तक्रारी आल्यानंतर व पुरातत्त्व विभागाला यावर्षी निधी उपलब्ध झाल्याने ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ला येथील काम थांबवण्यास सांगितले आहे. पुरातत्त्व विभाग ताबडतोब या परिसरात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन होण्यासाठी येथे दुरुस्ती करणार आहे. राज्य शासनाकडे येथील दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर सादर करण्यात येत आहे. -डॉ. विलास वाहने, सहायक संचालक पुरातत्त्व विभाग, पुणे