आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्टरसह, अभिनेता, गायकही जाळ्यात

नितीन पखाले
यवतमाळ : दिल्ली येथील नामांकित डॉक्टरला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून दोन कोटी रुपयांची रोकड उकळणाऱ्या अनन्यासिंग ओबेरॉय ऊर्फ संदेश अनिल मानकर या तरुणाच्या जबाबातून अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. केवळ दिल्लीतील डॉक्टरच नव्हे तर, एक अभिनेता, गायकही संदेशच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संदेशच्या कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली.

अनन्यासिंग ओबेरॉय या नावाने संदेश फेसबुक, इन्स्टाग्रामवर जे प्रोफाईल वापरायचा ते दक्षिण कोरियाची मॉडेल, अभिनेत्री चिआना फिलोमीनो हिचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. संदेश गेल्या साडेचार वर्षांपासून अत्यंत थंड डोक्याने समाजमाध्यम हाताळून अनेकांना गंडा घालत होता. तो बारावी शिकला असला तरी त्याची इंग्रजी भाषेवर उत्तम पकड आहे. तो अनेकांना संपर्क करून पहिले हाय, हेलो करीत संभाषण वाढवायचा. इतरांचे दु:ख आपल्याला बघवत नाही, असे म्हणत त्यांच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेत त्यांना अध्यात्मिक सल्ले द्यायचा. यातूनच दिल्लीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर त्याच्याकडे ओढल्या गेले. अनन्यासिंग जे सांगते ते ऐकले तर सर्व योग्य होते, असा विश्वास या डॉक्टरला झाला. त्यामुळे ती म्हणेल तसे डॉक्टर वागायचे. यातूनच अनन्या ऊर्फ संदेश याने नागपूरसह यवतमाळातील सराफा व्यावसायिकांकडून सात ते आठ लाखांची सोने खरेदी करून त्याची रक्कम डॉक्टरकडून ऑनलाईन वसूल केली. हरियाणातील एका अभिनेत्याने स्वत:ची शेती विकून अनन्यासिंगसाठी ८० लाख रुपयांची तजवीज केली होती. हे पैसे घेऊन तो हरियाणातून निघाला खरा, परंतु, मार्गात पोलिसांनी त्याची चौकशी करून वाहनाची झडती घेतली तेव्हा त्यात ८० लाखांची रोकड आणि पिस्तूल आढळल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडल्याने अनन्या ऊर्फ संदेशच्या कचाटय़ातून बचावला. एका गायकास मोठय़ा दिग्दर्शकाकडे गाण्याची संधी देण्यासाठीही संदेशने समाज माध्यमातून मध्यस्थी केली. त्याच्याकडून प्रारंभी ५० हजार उकळल्याचे त्याच्या जबाबातून पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संदेश गेल्या चार, पाच वर्षांपासून हे कारनामे करीत आहे. त्याचा आवाज व लकबी महिलेसारखीच आहे. फेसबुक, इन्सटाग्रामवर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. शिवाय दक्षिण कोरियाची मॉडेल, अभिनेत्री चिआना फिलोमीनो हिचे छायाचित्र, प्रोफाईल वापरून तो अपडेट राहायचा. गोवा, दुबई येथे आपला हॉटेलचा व्यवसाय असल्याचे सांगायचा. त्यामुळे कोणालाही त्याची शंका आली नाही.

असा झाला भंडाफोड

आपली बहीण यवतमाळात राहते आणि तिचे अपहरण झाल्याने तिला सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे भासवून त्याने दिल्लीतील डॉक्टरकडून दोन कोटी उकळले. ज्या समर नावाच्या तरुणाकडे डॉक्टरने यवतमाळात पैशांच्या दोन बॅग सोपवल्या, त्या तरुणाने डॉक्टरला एक सोनसाखळी भेट दिली. अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिल्याने अनन्याने ही भेट पाठवल्याचे सांगितले. या प्रकाराने डॉक्टर अधिकच भारावून गेले. मात्र काही वेळातच अनन्याचा फोन बंद झाल्याने घाबरलेल्या डॉ. रजतने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आणि हा हायप्रोफाईल सायबर गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास पोलिसांची दोन पथके करीत असून यात आणखी कोणाची फसवणूक झाली याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.