लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगरः अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लर्निंग) वापर करणाऱ्या अहिल्यानगर येथील उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. सन २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उपक्रमाला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील प्रथम क्रमांकाचा १० लाख रुपयांचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगरी यांना जाहीर झाला आहे. २०२४-२५ साठी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले, तर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये राहाता येथील मंडलाधिकारी मोहसीन शेख यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, अहिल्यानगर जिल्हा राज्यात अनेक क्षेत्रात अग्रेसर असून त्यामागे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आहेत. पुरस्काराने जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असून इतरांनाही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात विविध उपक्रम राबवले. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी कामकाजात संगणकीय प्रणालीच्या उपयोगावर भर दिला. जिल्हा प्रशासनाने गौणखनिज, ई रेकॉर्डस, इक्युजे कोर्ट प्रणाली, ई ऑफीस, ‘जलदूत’ पाणी टंचाई व्यवस्थापन, भुसंपादन आदी उपक्रमांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्यांना पारदर्शक, गतिमान पद्धतीने सेवा देण्यावर भर देण्यात आला.

अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लर्निंग) वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अवैध वाहतुकीला आळा घालण्यात येत आहे. कुठलेही मनुष्यबळ न वापरता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवैध गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ई-पंचनामा महाखनिज प्रणालीद्वारे करण्यात येऊन नोटीस व दंडाच्या आदेशाची प्रक्रिया संपुर्णपणे ऑनलाईन करण्यात येते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जिल्ह्याला ‘गोल्ड स्कॉच’ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

गौण खनिज विभागामार्फत नागरिकांना तात्पुरता परवाना, नवीन खाणपट्टा अर्ज, खाणपट्टा नूतनीकरण अर्ज, गौणखनिज विक्रेता परवाना यासारखे अनेक दाखले ‘महाखनिज प्रणाली’द्वारे नागरिकांना एका क्लिकवर मिळणे शक्य होत आहे. गौण खनिज उत्खनन व वाहतूक देखरेखीसाठी ‘महाखनिज ॲप’ तसेच गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांसाठी ‘महाखनिज ट्रक ॲप’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मंडलाधिकारी मोहसीन शेख यांच्या महसूलविषयक पुस्तकांच्या राज्यातील पहिल्या क्युआर कोड वाचनालयाला पुरस्कार जाहीर झाला आहे. महसूल विषयी माहिती देणारी पुस्तकातील भाषा बऱ्याचदा सामान्य नागरिकांना कळत नाही. शेख यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोप्या भाषेत ही पुस्तके लिहून घेतली. यापूर्वीदेखील ते ब्लॉगच्या सहाय्याने मार्गदर्शनपर लेख देत असत. तयार केलेल्या पुस्तकांचे छायाचित्र आकर्षक असून त्यावर क्युआर कोड देण्यात आला आहे. माहितीचा अधिकार, महसूल प्रश्नोत्तरे, १०१ महसूल लेख, ऑनलाईन सातबारा, तलाठी कामकाज, गोष्टीतून फेरफार अशी विविध अधिकाऱ्यांनी लिहिलेली ११ पुस्तके नागरिकांसाठी क्युआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

क्युआर कोड स्कॅन करून पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध होते. त्यामुळे आवश्यक कामासाठी हवे असेल तेव्हा माहिती मिळणे सुलभ होते. नागरिकांमध्ये अशा पीडीएफ शेअर होत असल्याने नागरिक शिक्षणासाठी या पुस्तकांचा उपयोग करतात. नागरिकांच्या समस्या दूर होण्यासाठी ते पुस्तके संदर्भासाठी घेत असल्याचे बघून समाधान होत असल्याचे शेख यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरालगतच्या ३० गावांसाठी सक्शन मशिनद्वारे मैला उपसा व गाळ व्यवस्थापनासाठी राहुरी पंचायत समिती व संबधित ३० ग्रामपंचायतींशी करारनामा केला. त्याचबरोबर मैला गाळ व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छतादूत बचतगटाशी करार केला आहे. या उपक्रमाअंतर्गत संकलित मैल्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य वाहतूक व व्यवस्थापन करण्यात येते. हा नाशिक विभागातील पहिला उपक्रम असून, यामुळे ग्रामीण व शहरी स्वच्छता सुधारण्यास मदत होईल. प्रकल्पाचे व्यवस्थापन बचतगटांकडे राहणार असून, त्यांना उत्पन्नातील १० टक्के हिस्सा मानधन म्हणून मिळेल. नगरपरिषदेचे अधिकारी, युनिसेफ आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येतो. या अभिनव उपक्रमाला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.