Raj Thackeray vs Uttar Bhartiya Vikas Sena : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी देखील या याचिकेद्वारे याचिकाकर्त्याने केली आहे. मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून म्हटलं आहे की “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी.”

सर्वोच्च न्यायालयाने राज ठाकरे व त्यांच्या पक्षावरील कारवाईसंदर्भात निवडणूक आयोगाला व राज्य सरकारला आदेश द्यावे, असंही या याचिकेत म्हटलं आहे. उभाविसेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. शुक्ला हे मुंबईचे रहिवासी आहेत असं त्यांनी त्यांच्या याचिकेत नमूद केलं आहे. गेल्या वर्षी मनसेने आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला होता असंही शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान, शुक्ला यांनी माध्यमांसमोर त्यांच्या याचिकेची एक प्रत दाखवली.

सुनील शुक्ला नेमकं काय म्हणाले?

सुनील शुक्ला म्हणाले, “राज ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिला आहे असं वाटतंय. तुमच्या कार्यकर्त्यांनी ज्या बँकेत जाऊन तिथल्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. ते कर्मचारी देखील हिंदू आहेत. त्यामुळे तुम्ही हिंदूविरोधी आहात. राज ठाकरे, तुम्ही केवळ उत्तर भारतीय नव्हे तर मराठी लोकांचे देखील विरोधक आहात. म्हणूनच मी तुमच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही. तुम्ही हिंदूंना मारू शकत नाही.”

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केलं होंत. त्यानुसार, राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना (पक्ष कार्यकर्त्यांना) दिले होते. त्यानुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. काही वेळा हिंसक आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या कानशीलात लगावल्या. मनसेच्या या आंदोलनानंतर उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.