वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एकदा बोलावलंही होतं असा खुलासा यावेळी त्यांनी केला आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यामुळे राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्यासंबंधी चर्चा रंगली आहे.
“शिवेसेनसोबत आमची युती होऊ शकते. आता करायची की नाही हे शिवसेनेने ठरवावं,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. यावर त्यांना हा शिवसेनेसाठी प्रस्ताव समजावा का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी तुम्हाला आणखी थोडी माहिती देतो. उद्धव ठाकरे यांनी मला एकदा बोलावलं होतं, पण त्यांची यावर बोलण्याची हिंमत झाली नाही”.
काँग्रेसलाही प्रस्ताव देण्यासंबंधी विचारलं असता त्यांनी माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही फक्त म्हणतात आमच्यासोबत फिरा असं मिश्कीलपणे म्हटलं. “याअगोदरही प्रस्वात देण्यात आले आहेत. आम्ही शिवसेनेची, काँग्रेसची दोघांची वाट पाहतोय,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरेंशी माझी चांगली ओळख आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो, बाळासाहेबांशीही माझे चांगले संबंध होते. पण आता लग्न करायचं की नाही हे आता त्यांनी ठरवावं. त्यांना फक्त मैत्रीच हवी आहे, त्याच्या पुढे जाण्यास तयार नाही,” असंही ते म्हणाले.