साताऱ्यात करोना लसी अभावी लसीकरण पुन्हा बंद करण्यात आले आहे. तर, लस मिळेल या आशेवर शासकीय व खासगी लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लस उपलब्धतेअभावी लसीकरणाचा वेग मंदावणार आहे.
करोना लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे करोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. पुणे येथून सातारा जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करून देणेही शासनाने बंद केले आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयातूनच खासगी लसीकरण केंद्रांना पैसे भरून घेऊन लस पुरवठा होतो. परंतु आता खासगी केंद्रांचा पुरवठाही बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद पडणार आहे. त्यामुळे साहजिकच शासकीय लसीकरणावरील ताण वाढेल. करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन लसीकरण वाढीण्याच्या उद्देशातून शासकीय केंद्रांबरोबर खासगी रुग्णालयांनाही तातडीने लस उपलब्ध करण्याची गरज आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाचा लाभ घेऊ शकतात.
साताऱ्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच तुलनेत मृतांची संख्याही वाढत आहे. अशावेळी परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांचे तातडीने लसीकरण होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात सहा लाख २६ हजार ४९ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये पाच लाख ४७ हजार ५९८ जणांनी लशीचा पहिला तर ७८ हजार ४४१ जणांचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाची गती अत्यंत कमी आहे.
जिल्ह्यात शासकीय ४४७ लसीकरण तर खासगी २७ केंद्रावरून लस उपलब्ध करून दिली जात आहे. खासगी लस सशुल्क असली तरी शासकीय केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये लस घेण्याला प्राधान्य दिले जात आहे . त्यामुळे सहाजिकच शासकीय लसीकरण केंद्रावरील ताण कमी होत आहे. सध्या शासनालाही आवश्यक तेवढी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे लसीकरण दोन-तीन दिवस बंद ठेवले जात आहे. तर खासगी केंद्रे पूर्णतः बंद आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांतील लसीकरण बंद पडण्याच्याच मार्गावर आहे. सहाजिकच शासकीय यंत्रणेवरील ताण वाढून लसीकरणाचा वेग मंदावणार आहे. यामुळे खासगी रुग्णालयांनाही तातडीन लस उपलब्ध करणे आवश्यक आहे.