राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त आधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा असं जाहीर आव्हान दिलं होतं. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर मनसे नेत्यांनी उत्तर दिलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा सुजात आंबेडकर यांनी त्या वक्तव्यामागे नेमका का अर्थ होता हे सांगितलं आहे.
औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी हजेरी लावली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात”; सुजात आंबेडकरांचं मोठं विधान
“मी अमित ठाकरेंना तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा असं काही वैयक्तिक निमंत्रण नव्हतं. ती एक बोलण्याची पद्दत असते. आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या ती बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलीत उतरतात प्रत्यक्षात ती बहुजन मुलं असतात”.
“माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा. जर तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही उतरवू नका,” असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.
अनेक लोकांना माझं म्हणणं पटलं असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की, लोकांनी बोलण्यापेक्षा मनसेमधील अनेक पदाधिकारी, मुस्लिम बांधवांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे.
“२०१४ मध्ये लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर कोणीही यावर बोलायला तयार नाही. करोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असं असतानाही जर भाजपा किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असतील तर येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सरळसरळ अर्थ होतो,” अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली.