वाडा तालुक्यातील कचांड येथे सुरू असलेल्या दगडखाणी तसेच खडी यंत्रामुळे येथील शेतांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन वाडय़ाचे तहसीलदार दिलीप संखे यांनी संबंधीत कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वाडा तालुक्यातील कचांड येथे माड माईन्स क्रशर कंपनी मार्फत दगडापासून वाळू तसेच खडी तयार करण्याचे काम केले जाते. या कंपनीमधून निघणारा धूर तसेच प्रदुषीत पाण्याचा आसपासच्या परिसरात असलेल्या शेतांमध्ये शिरकाव होत होता. यामुळे येथील शेतांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले होते. या बाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने अलिकडेच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन वाडय़ाचे तहसीलदार दिलीप संखे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांची बैठक बोलवली होती. याबैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली आहे. तसेच यापुढे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश संखे यांनी संबंधीत कंपनीला दिले आहेत.