पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. प्रत्येक जण जमेल तेवढी मदत शहिदांच्या कुटुंबीयांसाठी करत आहे. एल्फिन्स्टनमधल्या वडापाव विक्रेत्यानंही शहिदांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधी जमा केला आहे.
मंगेश अहिवळे या वडापाव विक्रेत्यानं महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अवघ्या पाच रुपयात वडापाव विकले. दिवसभरात एकूण १० हजार ८० वडापाव त्यांनी विकले होते. त्यातून ५० हजार ४०० रुपयांची रक्कम जमा झाली. ही रक्कम त्यांनी शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांकडे दिली आहे.
‘ही रक्कम माझी एकट्याची नसून प्रत्येक मुंबईकरानं मदत केली आहे. त्यामुळे ही मदत कष्ट करणाऱ्या प्रत्येक मुंबईकराची आहे’ अशी प्रतिक्रिया मंगेश अहिवळे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली आहे. मंगेश यांनी आज दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रत्येकी २५ हजारांची रक्कम सुपूर्त केली आहे.
‘आतापर्यंत अनेक राजकारणी, सेलिब्रिटींनी मदत केली पण सामान्य मुंबईकरांनीही मदत पाठवली हे पाहून खूप बरं वाटलं’, अशा शब्दात शहीद नितीन राठोड यांच्या भावानं मुंबईकरांचे आभार मानले आहेत. तर शहीद संजय राजपूत यांच्या कुटुंबीयांनी देखील मंगेश आणि समस्त मुंबईकरांचे आभार मानले आहेत.
मंगेश अहिवळे हे गेल्या काही वर्षांपासून एल्फिन्स्टन परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांचे कुटुंब चालतं. वडापावचा व्यवसाय करताना त्यातून मिळणारी काही रक्कम ते समाजसेवेसाठी देखील खर्च करतात. याआधी त्यांनी दृष्काळग्रस्तांनादेखील मदत केली होती. तर एल्फिन्स्टन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मयुरेश हळदणकर यांच्या कुटुंबियांना देखील त्यांनी आर्थिक मदत केली होती.
प्रतीक्षा चौकेकर
pratiksha.choukekar@loksatta.com