Vadhvan Port : वाढवण बंदर हा प्रकल्प लवकरच मार्गी लागून त्याचं काम सुरु होतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे बंदर चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्याच आठवड्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागतो आहे. या वाढवण बंदराचं महत्व काय? त्याच्याशी संबंधित पाच महत्त्वाचे मुद्दे कुठले? हे सगळं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लोकसत्ता दृष्टीकोन या व्हिडीओत सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे गिरीश कुबेर यांनी?
भाजपा, त्यांचा शतप्रतिशतचा नारा, काँग्रेस-राष्ट्रवादीतली वादावादी, शिवसेनेतले वाद या सगळ्या राजकीय भुणभुणीत एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात ३१ मार्चच्या आत वाढवण बंदराचे सगळे परवाने पूर्ण व्हायला हवेत असे आदेश दिले आहे. वाढवण बंद देशासाठी का महत्त्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
वाढवण बंदर का महत्वाचं?
मुंबईला एक ‘मुंबई’पण मिळालं आहे, तिची महानगरी झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला एक स्थान मिळालं आहे त्याचा थेट संबंध मुंबईच्या या बंदराशी आहे. मुंबईचं बंदर विकसित होत जाणं आणि मुंबईचा विकास होणं याचा थेट संबंध आहे. कोलकाता येथील बंदर नाहीसं झालं तेव्हा कोलकाताचं महत्त्व कमी झालं. मुंबईचं बंदर विकसित होत गेलं तेव्हा मुंबईला मुंबईपण मिळालं. त्यानंतर बंदर विकसित होणं थांबलं, मग न्हावा-शिवाचा पर्याय आपल्याला अवलंबावा लागला. गुजरातमध्ये अदाणी यांचं मुंद्रा पोर्ट ट्रस्ट आहे. या पार्श्वभूमीवर वाढवणचा विकास करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने घेतला आहे.
वाढवण बंदराचं महत्त्व सांगणारे पाच मुद्दे कुठले?
१) वाढवण हे देशातलं ऑफशोअर बंदर असणार आहे. ऑफशोअरचा अर्थ हे जमिनीवरचं बंदर असणार नाही. समुद्रात एक कृत्रीम बंदर तयार करुन त्याच्यावर या बंदराचा विकास केला जाईल. याचा अर्थ जमीन अधिग्रहण हे कमी प्रमाणात होईल. कृत्रीम बंदर याचा अर्थ असा होतो की जमिनीचा भाग तो समुद्रात तयार करणं. ज्याला लँड रिक्लमेशन असं म्हटलं जातं. समुद्रात भराव टाकून हे बंदर उभारलं जाईल.
२) दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या बंदराची खोली ही नैसर्गिक रित्या प्रचंड प्रमाणावर असेल. मुंद्रा, जेएनपीटी यांच्या खोलीला मर्यादा आहेत. १७ ते १८ मीटर अशी खोली किंवा ड्राफ्ट असा आहे. तर वाढवणची खोली २० ते २५ मीटरच्या आसपास असेल. ड्राफ्टचा अर्थ समुद्राची पाण्याची पातळी आणि बोटीचा किंवा नौका यांचा तळाचा बिंदू याचं अंतर मोजलं जातं ज्याला ड्राफ्ट असं म्हणतात. जे साधारण २३ मीटर पर्यंत मिळेल. याचाच अर्थ अत्यंत तगडं व्यापार जहाज वाढवण बंदरात आपल्याला आणता येईल.
३) वाढवण बंदर जेव्हा तयार होईल त्यावेळेला जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये वाढवणला स्थान मिळेल. कारण या वाढवण बंदराची क्षमता ही साधारण ३०० मिलियन मेट्रिक टन किंवा ३० कोटी मेट्रिक टन इतकी आहे, म्हणजेच वर्षाला सामानसुमानाची आयात-निर्यात होऊ शकते. मुंद्रा हे सर्वात मोठं बंदर धरलं तर १५० मिलियन मेट्रिक टन ही त्याची क्षमता आहे. ही लक्षात घेतली तर वाढवणची क्षमता किती मोठी आहे.
४) यातला चौथा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पहिल्या दिवसापासूनच या बंदरात नऊ व्यापार जहाजांच्या रांगा उभ्या करता येऊ शकते. एक डेक एक किमी लांबीची असणार आहे. प्रचंड व्यापार-उदीम होऊ शकणार आहे. हे बंदर मुंबई-बडोदा महामार्गाशी जोडलं जाईल, मुंबईशी जोडलं जाईल, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. पालघरमध्ये विमानतळासाठीची चाचपणीही सुरु आहे. त्यामुळे हे व्यापक स्वरुपाचं बंदर मुंबईला मिळणार आहे.
५) वाढवण हे बंदर हे सरकारी मालकीच्या कंपनीतून उभं राहतं आहे. विशिष्ट उद्योग समूहांना बंदरांचं काम दिलं जातं अशी टीका होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकार ७७ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार आणि जवाहरलाल पोर्ट प्राधिकरण यांच्या सहयोगाने हे बंदर उभं राहणार आहे. ७७ हजार कोटींचा प्रकल्प शासकीय पातळीवर उभा राहतो आहे त्यामुळे याचं महत्त्व किती आहे लक्षात घेतलं पाहिजे. असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.