कराड : लडाखच्या दक्षिण भागात न्योमा येथील कियारी परिसरात काल शनिवारी (दि. १९) रोजी सायंकाळच्या सुमारास लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात राजाळे (ता. फलटण) गावचे सुपुत्र वैभव संपतराव भोईटे या जवानांस वीरमरण आले. या अपघातात नऊ जवान शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे.
गॅरीसहून लेहजवळच्या क्यारी शहराच्या दिशेने जवानांना घेऊन निघालेल्या या ट्रकाचा लडाख कियारीजवळ सात किमी अंतरावर हा भीषण अपघात घडला. त्यात नऊ जवान शहीद झाले. एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे. तर, एक जवान जखमी झाला आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये वैभव भोईटे यांचा समावेश असल्याचे वृत्त समजताच राजाळेसह फलटण तालुक्यावर एकच शोककळा पसरली. राजाळे पंचक्रोशीसह ठिकठीकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
शहीद वैभव भोईटे यांच्या मागे आई बिबीताई, पत्नी प्रणाली, दिड वर्षांची मुलगी हिंदवी, वडील संपतराव धोंडीबा भोईटे, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. वैभव भोईटे यांचे पार्थिव उद्या सोमवारी दुपारी राजाळे येथे येईल आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शहीद जवानांबद्दल संरक्षणमंत्री केंद्रीय राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले आहे.