Vaibhav Naik On Rajan Salvi : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये राजन साळवी आणि वैभव नाईक यांचाही समावेश आहे. दरम्यान, पराभवानंतर आता राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चासंदर्भात बोलताना आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं सूचक भाष्य राजन साळवी यांनी केलं होतं. एवढंच नाही तर आज राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. त्यामुळे राजन साळवी यांच्या मनात नेमकं काय चाललंय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राजन साळवी यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर आज भाष्य केलं. तसेच राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, याचवेळी वैभव नाईक यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला आहे. “मला (वैभव नाईक) आणि राजन साळवी यांना शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या निवडणुकीनंतर ऑफर होती”, असं विधान वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
हेही वाचा : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
वैभव नाईक काय म्हणाले?
“राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते गेले १५ वर्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार म्हणून काम करत होते. मला खात्री आहे की राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार नाहीत. आज पक्षाच्या अडचणीच्या काळात ते शिवसेनेबरोबर राहतील. निवडणुकीत जर राजन साळवी यांच्या विरोधात वरिष्ठांनी काम केलं असेल तर याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं पाहिजे. उद्धव ठाकरे नक्कीच संबंधितांवर कारवाई करतील. राजन साळवी यांना आज निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जनसामान्यांमध्ये मान आहे. तो मान इतर पक्षात जाऊन मिळणार नाही. त्यामुळे मला खात्री आहे की राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार नाहीत”, असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
‘मला आणि राजन साळवींना शिंदे गटाची ऑफर होती’
“मला आणि राजन साळवी यांना शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेच्या निवडणुकीनंतर पक्षात येण्सासाठी ऑफर होती. मात्र, आम्ही लोकांबरोबर राहिलो, निष्ठावंत म्हणून राहिलो. आमच्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्या अडचणींवर मात करत आहोत. आज जिल्ह्यातील जनता आमच्याबरोबर आहे. यापुढेही आम्ही लोकांबरोबर राहून शिवसेना ठाकरे गटाचं काम सुरु ठेवणार आहोत”, असा गौप्यस्फोट वैभव नाईक यांनी केला.