भगवान गडाचे नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांनी ५२ दिवस जे काही सहन केलं त्या मानसिक यातना आहेत. एखादा माणूस संतपदाला पोहचला असता असं नामदेवशास्त्रींनी म्हटलं होतं. त्यावर आता बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलगी वैभवीची प्रतिक्रिया समोर आली आहे. नामदेवशास्त्रींना माझ्या वडिलांच्या अंगावरचे घाव दिसले नाही का? असा सवाल तिने केला आहे.
नामदेव शास्त्रींनी काय म्हटलं होतं?
जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, त्यांची मानसिकता का नाही दाखवली, त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगं आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले. तो गावातला विषय होता, पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले. महंत नामदेव शास्त्री म्हणाले, मी त्याला त्याला म्हणालो तू वारकरी सांप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता. कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसलं आहे. गेल्या ५३ दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली. त्यांच्या हाताला आता सलाईन लावलेलं आहे. असं राजकारण चांगलं नाही, त्याचा फार काळ फायदा होईल असं वाटत नसल्याचं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. ज्यावरुन आता वैभवी देशमुखने नामदेवशास्त्रींना प्रश्न विचारला आहे.
वैभवी देशमुखने काय म्हटलं आहे?
“नामदेवशास्त्रींना माझ्या वडिलांच्या अंगावरचे घाव दिसले नाही का? माझ्या वडिलांना हाल हाल करुन मारलं आहे, ते नामदेवशास्त्रींना दिसलं नाही का? न्यायाधीशही दोन्ही बाजू ऐकून घेतो. आमचं म्हणणं काय? हे नामदेवशास्त्रींनी ऐकून घ्यायला हवं होतं. जे लोक आले होते ते खंडणी मागण्यासाठीच आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना मारलं म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले, त्यानंतर माझ्या वडिलांनाच मारलं. एवढंच नाही तर त्यांचे क्रूर हाल करुन त्यांना ठार केलं. माझ्या वडिलांवरचे वार, त्यांचं रक्त, त्यांचे अश्रू हे नामदेवशास्त्रींना दिसले नाहीत का? असा सवाल वैभवीने केला आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
आरोपीची मानसिकता काय? हे दाखवण्यापेक्षा त्यांना वेळीच निर्बंध का घातले गेले नाहीत? जर ते घडलं असतं तर आज हा दिवस उजाडलाच नसता. असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत.