कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वे मार्गिकेने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची नाळ जोडण्याचा नवा प्रकल्प कोकण रेल्वेने तयार केला होता. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडले जाणार आहेत, याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करून त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा हवाई वाहतूक मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी दिली. त्याबाबतची अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, हा प्रकल्पाची लांबी १०७ कि.मी. असणार आहे. यासाठी ३४३८.५० कोटी रुपय मंजुरीला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
मी रेल्वेमंत्री असताना या प्रकल्पाचा पाठपुरावा करून सुरुवातीला ५०० कोटी रुपयाची मंजुरी त्वरित दिली होती. मला आशा आहे, यामुळे पश्चिम महाराष्ट्रची मोठी बाजारपेठ कोकणाला जोडली जाणार असून, कोकणातील व्यापाराला एक प्रकारे चालना मिळेल.
कोकण रेल्वेने कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना आखली होती. या योजनेनुसार कोकण रेल्वे वैभववाडी ते कोल्हापूर यादरम्यान एक माíगका बनवणार असून, त्यामुळे कोल्हापूर-वैभववाडी एकमेकांना रेल्वेने जोडले जाणार आहेत. या १०७ किलोमीटर मार्गाच्या उभारणीसाठी ३४३८.५० कोटी रुपये केंद्र शासनाकडून मंजूर झाले असून, त्यामुळे माल आणि प्रवासी वाहतूक या दोन्हीला चालना मिळणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी रस्ते वाहतुकीशिवाय काहीच पर्याय नाही. मात्र वैभववाडी-कोल्हापूर या मार्गामुळे रेल्वे हा सक्षम पर्याय उपलब्ध होईल.
कोकणी माणसांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारी कोकण रेल्वे आता लवकरच पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरच्या वैभववाडी ते कोल्हापूर अशी रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. ही घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सत्यात उतरवली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी ही मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले.