परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, अॅड. यशश्री मुंडे या दोघी भगिनींसह सर्व २० उमेदवार अडीच हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पॅनेल उतरवून पंकजा मुंडे यांना आव्हान दिले होते. नात्याने बहीण-भाऊ आणि कट्टर राजकीय विरोधक असलेल्या धनंजय व पंकजा यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. अखेर पंकजा यांनी विजय मिळवून आपले वर्चस्व स्द्धि केले. कारखान्याचे अध्यक्षपद दिवंगत मुंडे यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी अॅड. यशश्री मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होते.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या या कारखान्याची त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांचे पॅनेल आमने-सामने आल्याने दोघांनीही राजकीय प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांच्यासह अॅड. यशश्री मुंडे या बहिणींचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाला. विजयी उमेदवारांत आमदार आर. टी. देशमुख, फुलचंद कराड, ज्ञानोबा मुंडे, त्र्यंबक तांबडे, श्रीहरी मुंडे, नामदेव आघाव, भाऊसाहेब घोडके, दत्तात्रय देशमुख, पांडुरंग फड, महादेवराव मुंडे, आश्रुबा काळे, किसन शिनगारे, शिवाजी गुट्टे, विवेक पाटील, परमेश्वर फड, गणपतराव बनसोडे, जमुनाबाई लाहोटी, केशव माळी यांचा समावेश आहे. सर्व विजयी संचालकांसमवेत पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन हा विजय त्यांना अर्पण केला.
‘वैद्यनाथ’च्या निवडणुकीत विजय निश्चित होता. परंतु विरोधकांनी विरोधासाठी विरोध म्हणून सभासदांवर निवडणूक लादली. मात्र, त्यांना चपराक बसली. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श समोर ठेवून नवे संचालक मंडळ काम करील. कारखान्याला प्रगतिपथावर नेतील आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. नवीन संचालक मंडळातील सर्वात तरुण असलेल्या अॅड. यशश्री मुंडे यांची कारखाना अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवंगत मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री, दुसरी मुलगी खासदार डॉ. प्रीतम मुंडे व आता कारखाना निवडणुकीतून मुंडे यांची तिसरी मुलगी अॅड. यशश्री राजकारणात सक्रिय झाली आहे.
पराभव मान्य – धनंजय मुंडे
कारखाना निवडणुकीत वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनेलचा पराभव आपल्याला मान्य आहे. विजयी संचालकांनी शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे थकलेले उसाचे बिल द्यावे आणि कारखान्याला कर्जातून बाहेर काढावे, या साठी नूतन संचालकांना शुभेच्छा, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले. मात्र, निवडणुकीपूर्वी सत्तेचा गरवापर आणि प्रचारात सहानुभूतीचे राजकारण करीत आमचे उमेदवारी अर्ज बाद करून, तसेच नेतृत्वहीन पॅनेल असा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून विरोधकांनी विजय मिळवल्याचा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा