शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सुषमा अंधारे आणि ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याचं कारण सांगितलं आहे. “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. म्हणून आम्ही वेगळे झालो,” असं मत वैजनाथ वाघमारे यांनी व्यक्त केलं. ते रविवारी (१३ नोव्हेंबर) मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.
वैजनाथ वाघमारे म्हणाले, “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले.”
“…तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही”
“सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. मला त्यांना नेताच करायचं होतं. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं. पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नाही. तो त्यांचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही,” अशी माहिती वैजनाथ वाघमारे यांनी दिली.
“सुषमा अंधारे तोफ वगैरे काही नाही”
यावेळी वाघमारे यांनी सुषमा अंधारे तोफ वगैरे काही नाही, असं मत व्यक्त केलं. तसेच त्या ठाकरे गटात गेल्या हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही नमूद केलं.
“सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला”
विशेष म्हणजे वैजनाथ वाघमारेंनी चार दिवसात पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंविषयी सगळं सविस्तरपणे सांगणार असल्याचाही इशारा दिला. ते म्हणाले, “चार दिवस सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे.”
एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का?
एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का? या प्रश्नावर वाघमारे म्हणाले, “तशी वेळ आली तर अगदी निवडणूक लढेन. माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे माझा नेता, माझा पक्ष जो निर्णय देतील, जे काम करायला सांगतील ते करेन. एकनाथ शिंदेंची भूमिका चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याची आहे. ते सांगतील तसं मी काम करेन. माझ्यासमोर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही, मी निवडणूक लढेन.”
हेही वाचा : विभक्त पतीचा ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त प्रवेश; सुषमा अंधारे म्हणाल्या…
“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं?”
“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं? इतिहासाचे दाखले द्यायला तिला पुस्तक कोणी दिलं?” असा सवालही वाघमारेंनी अंधारेंना विचारला.