लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीत अनेक जागांवर मतभेद निर्माण झाल्याने कोणाला कोणती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चार जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली. उन्मेश पाटील आणि किरण पवार यांच्या पक्षप्रेवशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे. तर, महायुतीत या जागेवरून भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार असतानाही त्यांना या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तर, ठाकरे गटाकडे या जागेसाठी पात्र उमेदवार सापडत नसल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर यांनी २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढली होती.
हेही वाचा >> “मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले उमेदवार
- कल्याण लोकसभा मतदारसंघ – वैशाली दरेकर
- पालघर लोकसभा मतदारसंघ – भारती कामडी
- जळगाव – करण पवार
- हातकंणगले – सत्यजित पाटील
उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली. त्यावेळी कधी जाहीर करू असा प्रश्न ठाकरेंनी विचारला. तेव्हा पत्रकारांनी तत्काळ उत्तर देत आजच जाहीर करा, असं म्हटलं. त्यावर त्यांनी लागलीच कल्याण, पालघर, जळगाव आणि हातकंणगले येथील उमेदवारांची नावे जाहीर केली.
प्रकाश आंबेडकरांना सल्ला
प्रकाश आंबेडकरांनी नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा. या जागेवरून भाजपाने नितीन गडकरींना संधी दिली आहे. याबाबत प्रकाशजींना काही बोलणार नाही. कारण, आमच्या दोघांच्या आजोबांचा ऋणानूबंध होता. आपण हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो होतो. आज आपलं जमलं नसेल, भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.