लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : मंदिर वज्रलेपासाठी प्रसिद्ध असलेल्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्यावतीने माहुली येथील मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या समाधीची वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेमुळे या समाधीच्या चिरांचे आयुष्य पन्नास वर्षांनी वाढले आहे. या उपक्रमासाठी घोडे यांनी वैयक्तिक दोन लाखांची पदरमोड केली आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने ताराबाईंच्या समाधीची महाआरती आणि विशेष पूजा करण्यात आली. सातारकरांनी पुढाकार घेऊन महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन घोडे यांनी केले आहे.

मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांचे निधन इसवी सन १७६१ मध्ये साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली होती. मात्र, त्या समाधीच्या दगडी रचना माहुली येथे एका ठिकाणी उघड्या स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या पंधरा वर्षांत या समाधीच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धाराचे केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, कृष्णा नदीच्या पात्रात वाळूत गाडली गेलेली समाधी काही संघटनांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा चर्चेत आली. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. प्रसार माध्यमांनी या समाधीच्या दुरवस्थेविषयी आवाज उठवला होता.

मात्र, या संदर्भात पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाही. गौरव घोडे यांनी तातडीने आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून माहुली येथे येऊन या समाधीच्या दगडी चिरांना वज्रलेप केला. या समाधीच्या चिरांचे आयुष्य आणखी ५० वर्षांनी वाढवले. मूळचे बारामतीचे पण पुण्यात स्थायिक झालेले गौरव घोडे हे प्राचीन मंदिर पुरातन समाधी यांच्या जीर्णोद्धाराचे आणि संवर्धनाचे काम मागील वीस वर्षांपासून करतात. महाराणी ताराराणी यांच्या समाधीला वज्रलेप करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक दोन लाख रुपये खर्च केले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने या समाधीचा वज्रलेप झाल्यानंतर समाधीची विशेष पूजा बांधण्यात येऊन आरती करण्यात आली.

राजघराण्यातील मान्यवर सदस्य तसेच इतिहासप्रेमी, समग्र सातारकर यांनी पुढे येऊन महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन गौरव घोडे यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी राजे यांची कर्नाटक राज्यातील होदेगिरी येथे समाधी आहे. या समाधीला सुद्धा आपण विनामूल्य वज्रलेप करणार असल्याचे घोडे यांनी माध्यमांना सांगितले.