Walmik Karad Surrendered: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचे दावे राजकीय वर्तुळातून होत असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराडनं स्वत: यासंदर्भातला एक व्हिडीओ जारी केला आणि त्यानंतर तो पुण्यात सीआयडीच्या स्वाधीन झाला. या व्हिडीओमध्ये त्यानी आपण निर्दोष असल्याचाही दावा केला आहे. वाल्मिक कराड याच्या शरणागतीनंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे.
“पोलीस यंत्रणा कॉम्प्रोमाईज्ड”
वाल्मिक कराड यांना अटक करण्यात पोलिसांना आलेलं अपयश पाहाता पोलीस यंत्रणा व गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? असा प्रश्न पडत असल्याचं त्या टीव्ही ९ ला म्हणाल्या. “आज त्यांना शेवटी अटक झाली आहे. यातून पुढे सगळी चौकशी व्हायला हवी. या गोष्टीला २० दिवस लागले हे शॉकिंग आहे. ते पुण्यात शरण आलेत. १७ तारखेला त्यांच्या मोबाईलवरून केलेला शेवटचा कॉल पुण्यातला होता. आज ३१ तारखेला ते पुण्यातच शरण आले असतील तर याचा अर्थ ते इतके दिवस पुण्यातच होते. आता आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? हा प्रश्न पडतोय”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
“हे सगळे राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, फडणवीस, अजित पवार या सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत. जर गुन्हेगार लोकांचे राजकारण्यांशी संबंध असतील तर आपल्याला न्याय कधी मिळेल हा प्रश्न पडतो”, असंही त्या म्हणाल्या.
Video मध्ये काय म्हणाले वाल्मिक कराड?
“मी वाल्मिक कराड. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे”, असं वाल्मिक कराडनं व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.
इथे पाहा वाल्मिक कराड यांनी जारी केलेला Video
हत्येचा गुन्हा दाखल होईल?
दरम्यान, वाल्मिक कराड याच्याविरोधात फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणातील सहआरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड याच्याविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. “त्यांच्यावर गुन्हा काही दिवसांत दाखल झाला पाहिजे. आता वरचे राजकारणी काय करतात हे महत्त्वाचं ठरेल. कारण सगळी यंत्रणा मॅनेज होते. त्यांचे काही गुन्हे काढलेही जातील. पण खरच तपास झाला तर त्यातले सगळे धागेदोरे उघड होतील. सीआयडीच्या पथकाला दोन मोबाईल सापडले होते. त्या दोन मोबाईलमध्ये त्या घटनेचे रेकॉर्डिंग होते. कुणी इतक्या धक्कादायक घटनेचं रेकॉर्डिंग कसं करू शकतं हेच मला कळत नाही. त्याव्यतिरिक्त त्यात एका बड्या नेत्याचं नावदेखील होतं. हे रामराज्य तर नक्कीच नाहीये”, असं त्या म्हणाल्या.