महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्यासाठी अनेक बैठकात काथ्याकूट केला मात्र अखेर आघाडी काही होऊ शकली नाही. अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा फारसा लाभ वंचितला झाला नाही. स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. २०१९ साली ज्याप्रकारे वंचित बहुजन आघाडीला मतदारांचा पाठिंबा मिळाला होता, त्याप्रकारे यंदाच्या निवडणुकीत मिळू शकला नाही. या पराभवानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका मांडली आहे. ही भूमिका मांडत असताना त्यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
वंचितकडून एक्सवर दीर्घ पोस्ट टाकून पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे. “आम्ही आमच्या अपयशाचे आत्मपरीक्षण करू. हे समजून घेणे काही रॉकेट सायन्स नाही की, महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नाही. आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो”, अशी भूमिका वंचितने मांडली आहे.
अकोल्यात गेम झाला असता
या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने २ जागा वंचित बहुजन आघाडीला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती. महाविकास आघाडीचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा ४ ते ६ सांगायचे आणि ते ज्या जागांचा उल्लेख करायचे त्यात आम्हाला २०१९ मधे एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची. यावरून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे उत्तर मुंबईची न जिंकता येणारी जागा होती, तर अकोल्याच्या जागेत कधीही गेम होऊ शकतो. इंडिया आघाडी बरोबर जाऊन पडणे आणि स्वत:च्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग कायम राहतो आणि म्हणून आम्ही टिकण्याचा मार्ग स्वीकारला.”
“महाविकास आघाडीने एवढे अपमानित करुनही आम्ही सहभागी होण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. यासाठीचे पहिले पाऊलही वंचित बहुजन आघाडीनेच टाकले. जे गेले अनेक महिने दुर्लक्षित केले गेले. एक गोष्ट आम्ही अधोरेखित करतो की, महाविकास आघाडीने काही ठराविक बैठकींना आम्हाला बोलावले. बाकीच्या बैठकांना बोलावले नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ आहे. येत्या काही महिन्यांत मतदारांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत अधिक संवाद करू”, असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.