प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. अशातच प्रकाश आंबेडकर आणि मविआतील पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वंचितचा कधी काँग्रेसबरोबर, कधी राष्ट्रवादीबरोबर तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. वंचितने प्रणिती शिंदेंचा भाजपाच्या निवडणूक चिन्हाबरोबरचा एक फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. तसेच त्या नवीन पक्षात कधी जाणार असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना म्हटलं होतं की, मागील निवडणुकीत काही पक्षांमुळे काँग्रेसची मतं काही प्रमाणात कमी झाली होती. ज्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. जो पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची मतं कमी करतो किंवा मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो. काही पक्षांमुळे धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होतं. त्यामुळे तिथे काँग्रेस किंवा धर्मनिरपेक्ष विचारांचा नेता निवडून येत नाही.

प्रणिती शिंदेंनी त्यांच्या वक्तव्यात कोणत्याही नेत्याचं अथवा पक्षाचं नाव घेतलं नव्हतं. परंतु, या वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदेंविरोधात एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. यामध्ये प्रणिती शिंदेंचा भाजपाच्या कमळ या निवडणूक चिन्हाबरोबरचा फोटो आहे. तसेच फोटोच्या कॅप्शनमध्ये वंचितने लिहिलं आहे की, ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक… आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित आणि बहुजनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षाशी जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?

हे ही वाचा >> काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर? मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का?

प्रणिती शिंदेंची वंचितच्या पोस्टवर प्रतिक्रिया

दरम्यान, वंचितच्या या पोस्टवर आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेस ही माझ्या रक्तात आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही टिकवण्यासाठी काम करेन. कालपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. भाजपाविरोधातल्या लोकानी एकत्र यायला हवं ही आम्हा सर्वांचीच भूमिका आहे. परंतु, जे पक्ष धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन करतात ते अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करत आहेत. त्याचबरोबर मी त्या भाषणात कोणत्याही व्यक्तीचं अथवा पक्षाचं नाव घेतलं नव्हतं, तरीदेखील वंचित बहुजन आघाडीने त्यावर अशी प्रतिक्रिया का दिली आहे हे मला समजलं नाही. त्यांना यातून काय साध्य करायचं आहे माहिती नाही. मला असं वाटतं की, त्यांनी ती पोस्ट डिलीट करावी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aaghadi shared praniti shinde photo with bjp logo asc