वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होतेय असं वाटत असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यू टर्न घेत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर मविआ नेत्यांवर टीका करू लागले आहेत. तर मविआ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना भाजपाला मदत न करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (४ एप्रिल) प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच अकोल्यात जाऊन खुली ऑफर दिली. प्रकाश आंबेडकरांसाठी मविआचे रस्ते बंद झालेले नाहीत. मी तुमच्या भूमीवर येऊन सांगतोय, तुम्हाला किती जागा पाहिजेत ते सांगा. परंतु, भाजपाला पराभूत करण्यासाठी पुढे या.
नाना पटोले प्रकाश आंबेडकरांना म्हणाले, २०१४ आणि २०१९ मध्ये मताचं मोठं विभाजन झालं होतं. भाजपाने फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्याचं षडयंत्र रचलं आहे. तुम्ही त्यात सहभागी होऊ नका.
दरम्यान, नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीने प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच पटोलेंचं हे वक्तव्य म्हणजे केवळ अभिनय असल्याचं वंचितने म्हटलं आहे. त्याचबरोबर वंचितने पटोलेंवर गंभीर आरोपही केला आहे. वंचित बहुजन आघाडीने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, काल नाना पटोले यांनी अकोल्यात येऊन जॉनी वॉकरसारखा जबरदस्त अभिनय केला. नाना पटोलेजी एक गोष्ट सांगा, तुम्हाला संविधान वाचवायचं होतं तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांना महाविकास आघाडीची बैठक चालू असताना दीड तास बाहेर का बसवलं होतं? काँग्रेस आणि आमच्या नात्यात फूट पाडण्याचं काम करत असताना तुम्हाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पकडलं. त्या दिवसापासून काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या बैठकीत तुमच्याऐवजी बाळासाहेब थोरात सहभागी होऊ लागले. तुम्ही काल अकोल्यात भाषण केलंत तेव्हा ही गोष्ट देखील सांगायला हवी होती.
हे ही वाचा >> ‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
वंचितने यापूर्वीदेखील नाना पटोलेंवर आरोप केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपमधील काही नेत्यांबरोबर छुपे संबंध आहेत. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही, असा खळबळजनक आरोप वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात केला होता.