सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना बहुजन वंचित आघाडीने उमेदवारीबाबत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या चर्चेसाठी सोमवार दि. ८ जानेवारी रोजी ते पुण्यात जाणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली असून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी मतदार संघाचे धावते दौरे दिवाळीपासून सुरू केले असून काँग्रेसची उमेदवारी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनाच मिळेल असे संकेत आहेत.
हेही वाचा >>> “नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढतायत”, भुजबळांच्या टीकेवर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “तूच लय शहाणा अन्…”
तथापि, त्यांनी अद्याप हालचाली सुरू केल्या नसल्या तरी मतदार संघामध्ये संपर्क वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांनीही लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. बैलगाडी शर्यती, रक्तदान चळवळ या माध्यमातून त्यांनी सहा विधानसभा मतदार संघात संपर्क ठेवला असून बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना चर्चेसाठी पुण्याला येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भेटीचे आमंत्रण मिळाले असून चर्चेसाठी आपण सोमवारी पुण्याला जाणार असल्याचे सांगितले. मात्र, या बैठकीत लोकसभा निवडनुकीबाबत चर्चा होईल की अन्य बाबीबाबत याची आपणाला कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले.