Vandre East Seat Result 2024: विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल असं अनेकांना वाटलं. पण महायुतीने मोठं घवघवीत यश मिळवलं तर महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, यात शिवसेना ठाकरे गटालाही फारसं यश मिळवता आलेलं नाही. मात्र, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई हे विजयी झाले आहेत.
वरुण सरदेसाई यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली. तसेच त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) झिशान सिद्दिकी होते. मात्र, वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दिकी यांचा तब्बल ११ हजार ३६५ मतांनी पराभव केला. त्यामुळे विद्यमान आमदाराचा पराभव करत पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणारे वरुण सरदेसाई (Who is Varun Sardesai) यांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे वरुण सरदेसाई हे नेमकी कोण आहेत? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
वरुण सरदेसाई (Who is Varun Sardesai) कोण आहेत?
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि अतितटीची लढाई पाहायला मिळाली. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार वरुण सरदेसाई यांनी बाजी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) झिशान सिद्दिकी यांचा सरदेसाई पराभव झाला. वरुण सरदेसाई हे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच वरूण सरदेसाई (Varun Sardesai) हे आमदार आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यानंतर निवडणूक लढणारे ते ठाकरे घराण्यातील दुसरे सदस्य आहे. पेशाने सिव्हिल इंजिनीअर असलेले वरूण सरदेसाई यांनी २०१८ मध्ये सक्रीय राजकारणाला सुरुवात केली.
२०१८ मध्ये त्यांना युवासेनेचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर ते पक्षाच्या अनेक आंदोलनात प्रमुख चेहरा होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला मिळालेल्या यशामध्ये वरूण सरदेसाई यांचा महत्वाचा वाटा मानला जातो. दरम्यान, वरूण सरदेसाई यांनी विधानसभा लढवत विजय मिळवत आता ते विधानसभेच्या सभागृहात जाणाऱ्या तरुण आमदारांपैकी एक असणार आहेत.