सावंतवाडी: पर्यावरण, सागरी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या वनशक्ती आणि सागरशक्ती संस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कोळंब येथे”समुद्ररक्षक संमेलन ‘ आयोजित करण्यात आले होते. यावेळी वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी ‘भूतान देशा सारखं पर्यटकांकडून पर्यावरण रक्षण शुल्क सिंधुदुर्गात आकारले जावे असे स्पष्ट केले.या संमेलनामध्ये भारतातील पहिल्या सागरतळ स्वच्छता मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे यशस्वी पूर्णतेनंतर, सहभागी स्कुबा डायव्हर्स आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचा यथोचित गौरव यावेळी करण्यात आला.
सदर उपक्रमामध्ये एकूण ८ स्वच्छता मोहिमा राबवून मालवण किनारपट्टीवरून २,७५० किलो सागरी कचरा, त्यामध्ये प्रामुख्याने घोस्ट नेट्स आणि प्लास्टिक कचरा, संकलित करण्यात आला. यामध्ये सुमारे ८७,००० चौरस फूट क्षेत्रफळ शोधून स्वच्छ करण्यात आले, जे सागरी जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहे.सदर पथदर्शी मोहिमेत सहभागी झालेल्या स्कुबा डायव्हर्स भूषण जुवाटकर, जगदीश तोडणकर आणि त्यांच्या टीमने उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कांदळवन विभाग, मालवण नगरपरिषद, मत्स्यविभाग, नीलक्रांति संस्था, आणि Youth Beats for Climate (यूथ बीट्स फॉर क्लायमेट) या संस्थांनाही वनशक्ती संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास श्री. जिरापुरे (उप प्रादेशिक अधिकारी, रत्नागिरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), श्री. सुभाष पुराणिक (माजी वनविभाग अधिकारी, सिंधुदुर्ग), श्री. नंदकुमार पवार (प्रकल्प समन्वयक, सागरशक्ती), श्री. स्टॅलिन दयानंद (संचालक, वनशक्ती) व श्री. रोहित सावंत (प्रकल्प समन्वयक, कांदळवन विभाग), श्री. दिलीप घारे हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले की,”मालवणची सागरसंपत्ती विशेषतः सागरी प्रवाळ जैवविविधतेने नटलेली असून याचे संवर्धन करण्यासाठी वनशक्ती संस्थेतर्फे नेहमीच प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रशासन यांचा सहभाग अमूल्य ठरेल.” संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे सागरी पर्यावरणाचे महत्त्व जनमानसात पोहोचवणे व समुद्राच्या स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणणे हा होता. वनशक्ती संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी कासव मित्र सुहास तोरसकर तसेच पत्रकार अमित खोत यांचा सन्मानचिन्ह देऊन आदर करण्यात आला.उपस्थित या मध्ये चारूताई देऊलकर,स्वाती पारकर ,दर्शन वेंगुर्लेकर,काका भिसे,लक्ष्मीकांत खोबरेकर,डॉ.सुमेधा नाईक,डॉ.ज्योती तोरसकर.डॉ.सौ.पाटील, दुर्गा ठिगळे,बाबी जोगी,जगदीश खराडे,कांदळवन प्रतिष्ठान चे प्रतिनिधी यांनी आपली मते मांडली.सूत्र संचालन सौ. चित्रा मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.नंदकुमार पवार यांनी मानले.