मराठवाडी भाषेचा लहेजा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने कळाला तो ‘वऱ्हाड’च्या निमित्ताने. सरस्वती भुवनच्या सभागृहात एका सत्कारानंतर प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांनी काही ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’मधील काही पात्रे सजवून दाखवली. पुढे या नाटकाची नोंद गिनीज बुकात झाली. अख्खं वऱ्हाड ज्यांच्या घरात सामावलं आणि ज्या वऱ्हाडाची सरबराई ज्यांनी आयुष्यभर मन लावून केली, त्या विजयाताई देशपांडे यांचा आनंद आज गगनात मावेनासा होता. कारण, मराठवाडय़ातील संदीप पाठक या दमदार अभिनेत्याने ‘वऱ्हाड’चा प्रयोग हाती घेतला. वऱ्हाडकारांच्या अंगावरची शाल नसली, तरी हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी संदीपनेही प्रयत्न केल्याचे विजयाताई आवर्जून सांगतात. ‘वऱ्हाड’च्या त्या काळातील आठवणींचे पदर त्यांनी आज उलगडून सांगितले.
खरे तर लक्ष्मणराव देशपांडेंनी आचार्य अत्रेंच्या लिखाणावर पीएच.डी. करावी, असे विजयाताईंना वाटे. खूप कष्टात आयुष्य काढल्यानंतर नोकरी टिकवून राहावी, असा त्या मागे त्यांचा विचार होता. तत्पूर्वी देशपांडे दैनिक ‘अजिंठा’मध्ये नोकरी करीत. नंतर सरस्वती भुवनमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. या काळात नात्यांमधल्या नि भोवतालच्या लोकांच्या लकबी लक्षात ठेवून त्यांना पात्र रूपात आणण्याचा प्रयत्न कष्टपूर्वक लक्ष्मणरावांनी टिकवून ठेवला.. विजयाताई आठवणीचा पदर उलगडून सांगत होत्या. तेव्हा घर औरंगपुऱ्यात होते. संसारही काटकसरीने करावा लागे. भोवताली भरपूर रहदारी होती. त्यामुळे पात्रांच्या आवाजाचा सराव करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ते जागायचे. तेव्हा रेडिओही नव्हता आणि टेपही नव्हता. एका ट्रकचालकाकडून एक टेप देशपांडेंनी विकत आणला. त्यावर वेगवेगळे आवाज रेकॉर्ड करून ते सराव करायचे. पहाटे कधीतरी तीन वाजता झोपायचे, पुन्हा दिवसभराचा कार्यक्रम ठरलेलाच असायचा.
विद्यापीठात रुजू झाल्यानंतर तर उशिरापर्यंतची जागरणे नि पात्रांच्या आवाजाचा सराव ही घराला सवयच झाली होती. ‘वऱ्हाड’च्या पहिल्या काही प्रयोगांना केवळ हार नि पुष्पगुच्छ मिळायचे. नंतर नारळ येऊ लागले. नारळाच्या सर्व प्रकारच्या रेसिपीज करून झाल्या आणि मग खऱ्या अर्थाने ‘वऱ्हाड’चे व्यावसायिक रूप दिसू लागले. पात्रे वाढली. त्यांच्या लकबी, आवाज याने मराठी मनाचा अक्षरश: ठाव घेतला. पुणे आणि मुंबईमध्येही ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकू लागले. अशा काही प्रयोगांना जाता आले. प्रयोग सुरू होण्यापूर्वीच्या दोन घंटा वाजेपर्यंत विजयाताई बाहेर थांबायच्या. तेव्हा येणारे-जाणारे लोक आवर्जून पाहायचे. त्यांना वाटायचे, यांच्या घरचे कोणी येणे बाकी आहे. अधिकची तिकिटे यांच्याकडे मिळू शकतील. कोणीतरी धाडसाने विचारायचे, ‘तुमच्याकडे अधिकची तिकिटे असतील तर द्याल का’, तेव्हा विजयाताईंचे मन भरून यायचे. हा प्रयोग मराठवाडय़ातील कलाकारानेच करावा, अशी इच्छा होती. संदीप पाठकने सरस्वती भुवनमध्ये हा प्रयोग पूर्वी एकदा केला होता. आता त्याने मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा प्रयोग बघण्याची उत्सुकता सर्वानाच आहे. विजयाताईंनाही हा प्रयोग यशस्वी व्हावा, असे वाटते. ज्यांनी लक्ष्मणरावांचे प्रयोग महाराष्ट्रभर घडवून आणले, असे संदीप सोनार, प्रफुल्ल महाजन, नाशिकचे जोतगावकर यांनीच पुढचेही प्रयोग घडवून आणावे, अशी विजयाताईंची इच्छा आहे. लंडनला गेलेले वऱ्हाड मधले काही दिवस कोण करणार, हा प्रश्न होता. आता तो राहिला नाही. संदीप पाठक ‘वऱ्हाड’मधील सर्व आवाजांसह आणि त्याच पात्रांना घेऊन रंगमंचावर अवतरतो आहे. औरंगाबादेत बुधवारी रात्री आयोजित केलेल्या या एकपात्री नाटय़ाच्या नवीन प्रयोगाला रसिकांनी चांगली दाद दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा