सामाजिक प्रबोधन चळवळीत सक्रिय असणाऱ्या त्रमासिक ‘परिवर्त जनता परिवार’च्या वतीने रविवारी येथे परिवर्त साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष आणि भरारी महिला बचत गट महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा कविता कर्डक, निमंत्रक प्रा. गंगाधर अहिरे यांनी दिली.
शहरातील गंजमाळजवळील रोटरी क्लब सभागृहात सकाळी ९.३० वाजता परिषदेचे उद्घाटन नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक सुधीर भगत यांच्या हस्ते करण्यात येणार असून ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक संजय जीवने हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. उद्घाटन सत्रात विविध कार्यक्रमांसह परिवर्त जनता विशेषांकाचे प्रकाशन, अशोक गांगुर्डे लिखित ‘अभिसरण’ नाटक आणि कवी अरुण काळे संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. औरंगाबदच्या शाहीर मीराबाई उमप यांना महाकवी वामनदादा कर्डक ‘वादळवारा’ आणि नागपूरचे कवी केतन पिंपळापुरे यांना अरुण काळे स्मृती ‘अजातशत्रू’ काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर वादळवारा पुरस्कारप्राप्त शाहीर मीराबाई उमप या प्रबोधन गीते सादर करतील.
दुसऱ्या सत्रात ‘सुगावा’चे संपादक विलास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन सभा होणार असून यात ‘परिवर्तनवादी साहित्य व संस्कृतीपुढील आव्हाने’ या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे आणि वरिष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी विचार मांडतील. तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात कणकवलीचे उत्तम पवार, मुंबईचे धुरंधर मीठबावकर यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर कवी सहभागी होतील. अखेरच्या सत्रात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कला विद्या शाखेचे अधिष्ठाता व साहित्यिक डॉ. भरत हंडीबाज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र शिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील जयंत भालेराव, कवयित्री अरुणा अहिरे, नंदकिशोर साळवे, दीपचंद दोंदे, रामदास दोंदे यांना नाशिक जिल्हा वाङ्मयीन सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
परिषदेस मुंबई येथील साहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र खंडागळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक काभुराज बोढारे, कवी अमोल बागूल, करुणासागर पगारे, नंदकुमार कर्डक, बाळासाहेब कर्डक, प्रसिद्ध साहित्यिक अरविंद सुरवाडे, डॉ. त्र्यंबक दुनबळे, चंद्रकांत गजभिये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेस साहित्य रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाऊसाहेब अहिरे, अशोक मोरे, रवींद्र मालुंजकर, किशोर शिंदे, जयंत बोढारे, अशोक भालेराव आदींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा