अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि एकदम वाढलेला उन्हाळा अशा विचित्र हवामानामुळे शहरात विविध साथींच्या आजारांची लागण झाली आहे. या साथीच्या आजारांपासून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या महिनाभरापासून शहरासह जिल्हय़ात अवकाळी पावसाळय़ाचे वातावरण आहे. शहरात दोनतीनदा मोठा पाऊसही झाला. शिवाय जिल्हय़ात अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गारपीट झाली. गारपीट व अवकाळी पाऊस आता थांबला असला तरी वातावरण कमालीचे खराब झाले आहे. पावसाळी वातावरण दूर होतानाच एकदम उन्हाळय़ाचा कडाका सुरू झाला असून मधूनच आभाळही येते. त्यामुळे उष्णता आणखी वाढली आहे. उन्हाची तीव्रताही तुलनेने खूपच आहे. उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच असहय़ उकाडय़ाचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या तापमानाने ३५ अंशाची पातळी गाठली असून पुढच्या दोन महिन्यांत तर त्यात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होते. असे असले तरी पहाटे व रात्रीचा गारवा मात्र अजूनही बंद झाला नसून, हा विरोधाभास अधिक त्रासदायक ठरत आहे. वेगाने वाहणारे वारे त्यात आणखी भर घालत आहेत. या विचित्र वातावरणाने नगरकर हैराण झाले असून साथींच्या आजाराने अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत.
मनपाच्या आरोग्य विभागाने याबाबत निवेदनच प्रसिद्धीस दिले असून त्यात आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. या विचित्र वातावरणाची नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन मनपाने केले आहे. विशेषत: घरातील पाणीसाठे झाकून ठेवावेत, उघडय़ावर पाणी साठू देऊ नये, सांडपाणी उघडय़ावर सोडू नये, डासांपासून पसरणारे आजार लक्षात घेऊन खिडक्यांना जाळय़ा लावून त्यांना प्रतिबंध करावा अथवा डासप्रतिबंधक अन्य उपाय करावे, आठवडय़ातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या दिवशी घरातील सर्व भांडी व पाणी साठवण्याची साधने धुऊन कोरडी करावीत, ताप आल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे आदी सूचना मनपाच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. मलेरिया विभागालाही सतर्क करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत पाण्यामध्ये अळीनाशक औषधे, कीटकनाशक फवारे, धूरफवारणी सुरू आहे. शहरातील सर्व डॉक्टर व रुग्णालयांनाही याबाबत सूचना देण्यात आल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader