सांगली : दिवसभर उन्हाचा तडाखा, संध्याकाळी पावसाची एखादी सर आणि पहाटे धुके यामुळे सध्या पिकांवर विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. द्राक्ष बागांच्या फळछाटण्या रखडल्या असून खरीप पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. धुक्यामुळे रान कठीण बनल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही रखडल्या आहेत. संमिश्र हवामानामुळे किरकोळ आजाराचे रुग्णही वाढले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी दिवसभर उन्हाचा तडाखा ऑक्टोबर हिटची आठवण करून देणारा आहे. दिवसाचे कमाल तपमान ३० अंशांपर्यंत असले तरी ढगाळ हवामानामुळे ३२ अंशांपर्यंत भासत आहे. तसेच एखादी हलकी पावसाची सरही काही भागांत येत आहे. अशा स्थितीत गेल्या दोन दिवसांपासून पहाटे पाचनंतर सकाळी साडेचारपर्यंत धुके पडत आहे. धुक्यामुळे मोकळी राने कठीण बनत असून रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी जमीन अयोग्य ठरत आहे. तसेच मूग, उडीद या काढणीला आलेल्या कडधान्याची पानगळ होत आहे. दिवसाच्या उष्णतेने रानात वेलीवरच कडधान्याच्या शेंगा फुटत असून गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने तालीच्या रानात अजून पाणी साचले आहे. ऊन, जमिनीत पाणी आणि पहाटे पडणारे धुके यामुळे कडधान्याचा पाला काळा पडत आहे.
आणखी वाचा-धाराशिव : ओबीसीतूनच आरक्षण द्या! जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाच्या फळछाटणीचा हंगाम सुरू करण्यात येतो. आगाप छाटणी केली तर बाजारात हंगामपूर्व माल येत असल्याने चांगला दर मिळण्याच्या आशेवर शेतकरी असतात. यंदा मात्र पावसाने दमदार हजेरी लावली असून संमिश्र वातावरणामुळे आगाप फळछाटण्याही लांबल्या आहेत. काडीवरील डोळे फुटू लागले असून वांझचे प्रमाणही अधिक दिसत आहे. यामुळे हवामान बदलानंतर फळछाटणीचा हंगाम एकाच वेळी सुरू झाला तर मालही एकाच वेळी बाजारात येऊन पुन्हा नुकसानीची भीती आहे.
खरीप हंगामातील भात पिकावरही धुक्याचे परिणाम शिराळा तालुक्यात दिसून येत आहेत. जे पीक आगाप आहे त्याला धोका नसला तरी जे पीक निसावण्याच्या स्थितीत आहे, त्या पिकावर करपा, बुरशीजन्य रोग पडत आहे. यामुळे भाताची लोंबी पोकळ राहण्याची भीती असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तर भुईमुगाची पाने लवकर काळी पडून शेंग भरण्याची प्रक्रियाही मंद झाल्याने वेल वाळून उत्पादन घटणार आहे.
आणखी वाचा-कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावाला सुरीने भोसकले
साथीचे आजारही वाढले
दिवसभर असह्य उकाडा जाणवणारे ऊन, रात्री थंडी, आली तर एखादी पावसाची सर आणि पहाटे पडणारे धुके यामुळे सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप आणि खोकला याचे रुग्ण वाढले आहेत. यावरील उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. किरकोळ आजार असले तरी दक्षता घेणे गरजेचे आहे. -डॉ. विनोद परमशेट्टी