शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आता युवासेनेचे (ठाकरे गट) नेते वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा कथित व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी बनवला आहे. त्यांनीच हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह केला होता. त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून राज सुर्वे यांना पोलीस अटक करतील, असं विधान वरुण सरदेसाई यांनी केलं. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शीतल म्हात्रे यांच्या कथित व्हिडीओबद्दल विचारलं असता वरुण सरदेसाई म्हणाले, “मला जितकं कळतं त्यानुसार, पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर पोलिसांचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे, ते म्हणजे हा व्हिडीओ मॉर्फ झाला आहे की नाही? हे शोधणं. संबंधित व्हिडीओ मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे? तो समोर आला पाहिजे.”
हेही वाचा- साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
“माझ्या माहितीनुसार, हा जो खरा व्हिडीओ आहे, तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह केला आहे. त्यामुळे जर या प्रकरणात कुणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करू शकतील. मुंबई पोलीस दल हे अतिशय सक्षम पोलीस दल आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे, ते बरोबर जो मुख्य आरोपी आहे, ज्याने हा व्हिडीओ बनवला म्हणजेच प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे याला अटक करू शकतात,” असंही वरुण देसाई म्हणाले.