कल्पेश भोईर
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे दंड आकारण्यास पोलिसांनी सुरुवात केली असली तर वाहनचालकांनी मात्र असा दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे. चालू वर्षांत वाहनचालकांवर ५ कोटी २८ लाखांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र केवळ १५ टक्के लोकांनी दंड भरला असून साडेचार कोटींची थकबाकी आहे. दोन वर्षांत मिळून सात कोटींची थकबाकी झाली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पूर्वी पावती फाडून रोख रकमेच्या स्वरूपात दंड आकारला जात होता. त्यामुळे वाया जाणारा वेळ, भ्रष्टाचार तसेच वाद टाळण्यासाठी ई-चलन पद्धत अमलात आणण्यात आली. या पद्धतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून दंडाची रक्कम त्यांच्या मोबाइलवर आणि घराच्या पत्त्यावर पाठवली जाते. वसईतील वाहतूक पोलिसांनी मागील वर्षांपासून ई-चलन पद्धत लागू केली. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी ३० इलेक्ट्रॉनिक यंत्रे पुरविण्यात आली होती.
२०२० या चालू वर्षांत (३० नोव्हेंबर २०२० पर्यंत) वाहतूक पोलिसांनी १ लाख ३९ हजार ८२२ जणांवर ई-चलन कारवाई करून ५ कोटी २८ लाख ४१ हजार २५० इतका दंड लावण्यात आला आहे. यातील फक्त १५ टक्के नागरिकांनी हा दंड भरला असून यातील ४ कोटी ४८ लाख रुपये ८२ हजार ९०० रुपये इतक्या दंडाची रक्कम अजूनही थकीत राहिली आहे.
मागील वर्षी २०१९ मध्ये वाहतूक पोलिसांनी ८७ हजार ३५१ जणांवर कारवाई करून ३ कोटी ३४ लाख ४० हजार रुपये इतका दंड ठोठावला होता. त्यातील फक्त ५६ हजार ८८७ वाहनचालकांनी दंड भरला होता. त्या वर्षीचा तब्बल २ कोटी ३ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड थकीत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत मिळून वाहनचालकांनी वाहतूक विभागाचा तब्बल सात कोटी रुपयांचा दंड थकविल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
हा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतात. ज्या वेळी नाकाबंदी असते त्या वेळी वाहने थांबवून दंडाची रक्कम शिल्लक आहे का याची तपासणी केली जाते. शिल्लक असेल तर ती रक्कम भरण्यास सांगितले जात असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
ई-चलनाद्वारे आकारलेला दंड
वर्ष २०१९
* ई-चलन कारवाई : ८७ हजार ३५१ वाहनचालक
* आकारलेली दंड रक्कम : ३ कोटी ३४ लाख ४० हजार १००
* ई-चलन दंड भरलेले : ३० हजार ४६४ वाहनचालक
* दंड रक्कम – १ कोटी ३१ लाख ६ हजार ६००
* चलन दंड न भरलेले- ५६ हजार ८८७
* दंड थकीत रक्कम -२ कोटी ३ लाख ३३ हजार ५००
वर्ष २०२०
* ई-चलन कारवाई : १ लाख ३९ हजार ८२२
* दंड रक्कम : ५ कोटी २८लाख ४१ हजार २५०
* ई-चलन दंड भरलेले: १७ हजार ९३७
* भरलेली दंड रक्कम : ७९ लाख ५८ हजार ३५०
* ई-चलन दंड न भरलेले: १ लाख २१ हजार ८८५
* दंड थकीत रक्कम : ४ कोटी ४८ लाख ८२ हजार ९००
दंड न भरल्यास वाहन जप्त करणार
ई-चलन पद्धतीने कारवाई होत असल्याने दंड भरण्याची जबाबदारी ही वाहनचालकांवर सोपविण्यात आली आहे. काहीजण कारवाई होऊनसुद्धा दंडाची रक्कम भरत नाहीत. अशा वाहनचालकांवर वाहतूक विभागाची कारवाई सुरूच असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे. ज्यांची चलन दंडाची रक्कम जास्त झाली असल्याचे निदर्शनास येते त्यांच्यावर वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे. ज्यांच्या ई-चलन दंडाची रक्कम बाकी आहे त्यांनी रक्कम अदा करावी अन्यथा वाहन जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.