सुहास बिऱ्हाडे

३५० विकासकांना नोटिसा; ४० बांधकाम परवानग्या रद्द

वसई-विरार शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कंबर कसली आहे. शहरात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केली जात असताना ती उभाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील तब्बल ३५० बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा काढल्या आहेत, तर तब्बल ४० बांधकाम परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वसई-विरार शहरात बेसुमार अनधिकृत बांधकामे झाली आहेत. राखीव जागा हडप करून, बनावट कागदपत्रे बनवून, अतिक्रमणे करून बेसुमार बांधकामे करण्यात आली आहेत. याविरोधात मागील तीन वर्षांपासून महापालिकेने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. नगररचना विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांचाा आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नगररचना विभागातून तब्बल ३५० प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा संबंधीत प्रभागातील प्रभारी साहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना नगररचना विभागाचे प्रमुख संजय जगताप यांनी सांगितले की, आम्ही शहरातील सर्व प्रकरणांचा अभ्यास केला आहे. आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्यांची शहानिशा करण्यात आली आहे. आतापर्यंत आम्ही साडेतीनशेहून अधिक प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा संबंधित प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत आणि त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. साहाय्यक आयुक्तांनीही त्याच्याकडे आलेल्या तक्रारीचा तपास करून गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकांची संख्या ४००हून अधिक असेल, असे ते म्हणाले.

अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अनेक साहाय्यक आयमुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून अनेकांना निलंबितही करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्याविरोधात न्यायालयात लढा देण्यासाठी नेमण्यात आलेल्या वकिलांच्या पॅनेलचे काम समाधाानकारक नसल्याने त्यांचे पॅनलही बरखास्त करण्यात आले होते.

नियमाचे उल्लंघन

इमारत बांधण्यापूर्वी महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिली जाते. मात्र बांधकाम व्यावसायिक त्याचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम करत असतात. जर तीन मजल्यांची परवानगी असेल तर चौथा मजला अनधिकृतपणे चढवला जातो. अशी अनेक प्रकरणे शहरात आहे. महापालिकेने अशा इमारतींना दिलेल्या बांधकाम परवानग्याच रद्द करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दिलेल्या ४० बांधकाम परवान्या आम्ही रद्द केल्या आहेत, अशी माहिती आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिली.

आमच्या विभागाने आलेल्या तक्रारींची शहानिशा करून, त्याचा तपास करून ३५०हून अधिक प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तशा नोटिसाही काढण्यात आल्या आहेत.

– संजय जगताप, नगगरचनाकार, वसई-विरार महापालिका

अनधिकृत बांधकामविरोधातील मोहीम सतत चालू आहे. हजारो बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. ४० संशयित प्रकरणातील बांधकाम परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत.

– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार

Story img Loader