वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनासाठी मुख्य कार्यालयास कुलूप ठोकल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शांताराम आहेर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘दाम बंद काम बंद’ या तत्त्वानुसार आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारी दुपारी आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत वसाका कामगार व अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीस संचालक शांताराम जाधव, रामदास देवरे, आनंदा देवरे उपस्थित होते. या वेळी कामगारांना मार्गदर्शन करताना आहेर यांनी मार्गदर्शन केले.
वसाकात आता भ्रष्टाचार करण्यास आता काही शिल्लक न राहिल्याने विद्यमान अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार व त्यांच्या समर्थक संचालकांनी राजीनामा दिल्याचा आरोप त्यांनी केला. कामगारांना न्याय मिळेपर्यंत वसाकाची साखर बाहेर जाऊ देणार नाही.
वसाकाच्या कामगारांचे संसार उघडय़ावर टाकणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पंडित निकम आदी उपस्थित होते.