सांगली : स्व. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्यात पुढाकार होता म्हणून शरद पवार यांच्याबाबत स्व. दादांनी कधीही बदल्याची भावना ठेवली नाही, यामुळे वारसदार म्हणून तीच भावना जोपासण्याची आम्हाला गरज नाही, असे मत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर काही विघ्नसंतोषी लोकांकडून वसंतदादांच्या आत्म्याला शांती लाभली असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. याच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे स्पष्ट करून पाटील म्हणाले, जुलै १९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना बंडखोरी झाल्याने सरकार कोसळले. याबद्दल दादांनी मनात कधीच बदल्याची भावना ठेवली नव्हती. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे हीच भावना होती, ती त्यांनी पूर्ण केली. यामुळे वारसदार म्हणून आमच्या मनात कधीच बदल्याची भावना नाही, ती आमची संस्कृतीही नाही.

हेही वाचा – अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत? छगन भुजबळ म्हणाले…

आज आम्ही काँग्रेसमध्ये कार्यरत असून या पक्षाची विचारधाराही बदल्याची नाही. यामुळे महाविकास आघाडीमध्ये जर पक्ष नेतृत्वाने खासदार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला तर आम्हीही पक्षाचा आदेश मानून पवार यांच्या आदेशानुसार कार्यरत राहू. विधानसभेत आता काँग्रसचे संख्याबळ अधिक आहे. यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार असेल तर ते माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनाच मिळायला हवे. यासाठी आम्ही पक्षाकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant dada had no revenge towards sharad pawar says vishal patil ssb