लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेला जय महाराष्ट्र करुन वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे हे चांगलेच चर्चेत राहिले होते. आता याच वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला महिना उलटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचीही साथ सोडली आहे आणि थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधलं आहे. राज ठाकरेंचा एकेकाळचा पुण्यातला शिलेदार अशी ओळख असलेले वसंत मोरे हे आता व्हाया वंचित बहुजन आघाडीतून थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेला आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला. साहेब मला माफ करा असं मी त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. मला माझ्या पाठिशी असणार्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय हा विचार करुनच घेतला आहे. मला प्रकाश आंबेडकरांचा फोन आला होता पण मी त्यांना सांगितलं की आता खूप उशीर झाला आहे. मी गुरुवारीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता मी पूर्वीच्या पक्षात जात आहे असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

लोकसभेला वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त

वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील. याबाबत बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या १८-१९ व्या वर्षी मी इकडेच शिवसेनेची शाखा सुरु केली. ३१ वर्षांचा होईपर्यंत मी शिवसेनेतच होतो. त्यामुळे आता मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जुलै रोजी मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवबंधन बांधणार आहे असंही वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरेंनी घेतली ठाकरेंची भेट, विधानसभेची उमेदवारी मिळणार?

उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती पूर्ण करेन

कुठल्याही प्रलोभानापोटी मी शिवसेनेत जात नाहीये. उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेन. विधानसभा का महानगरपालिका लढवायची हे लवकरच ठरवले जाईल. पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणे न देणे, माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे सगळे लक्षात घेता वंचित पक्ष सोडला. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांनी माझं काम केलं नाही. त्यामुळे माझे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशी या गोष्टी संदर्भात चर्चा झाली होती, असंही वसंत मोरेंनी सांगितलं.

वसंत मोरेंबाबत संजय राऊत काय म्हणाले?

वसंत मोरे फक्त लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीत गेले होते, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. अनेक लोक निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातात. गोपीचंद पडळकरही निवडणूक लढायला वंचितमध्ये गेले होते, मग त्यांचं काय? लोकशाहीत आणि राजकारणात लोक पक्षांतर करतात, भूमिका बदलतात. आमचे ४० आमदार गेले, पण आम्ही त्यांचा पराभव करु. या देशात लोकशाहीचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना लोकशाही मान्य असली पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.