दक्षिण कोकणात कणकवली येथे साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला इत्यादी विविध कलांची मनोभावे जोपासना वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली ३३ वर्षे अव्याहतपणे करीत असून उपक्रमांच्या सातत्यासाठी संस्थेला मोठय़ा प्रमाणात कायमस्वरूपी निधीची नितांत गरज आहे.
प्रसिद्ध तबलावादक कै. वसंतराव आचरेकर यांच्या नावाने १९८० मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली. साहित्य-नाटय़क्षेत्राशी संबंधित मान्यवरांची व्याख्याने-परिसंवाद, बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा, समांतर रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग, शास्त्रीय गायन स्पर्धा आणि प्रशिक्षण, लहान मुलांच्या कला विकासासाठी ‘सृजन वाटा’ हा अभिनव प्रयोग, असे अनेक लक्षवेधी उपक्रम प्रतिष्ठानतर्फे नियमितपणे हाती घेतले गेले आहेत. मात्र त्यासाठी कायमस्वरूपी प्रायोजक किंवा ठेव स्वरूपातील निधीची व्यवस्था नसल्यामुळे कार्यक्रम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करत असतानाच खर्चासाठी आर्थिक तरतूद करण्याचा ताण संस्थेच्या कार्यकर्त्यांवर नेहमी असतो. तो नाहीसा होऊन केवळ दर्जेदार कार्यक्रमाच्या आयोजनावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून प्रतिष्ठानला भक्कम आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे.
हे उपक्रम आपल्या सोयीनुसार आयोजित करता यावेत म्हणून प्रतिष्ठानने सुमारे दीड एकर जमीन घेतली आहे. त्यावर ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने सुयोग्य नाटय़गृहही बांधले आहे. पण निधीअभावी त्याचे आधुनिकीकरण रखडले आहे. तसेच सध्या केलेल्या बांधकामासाठीही बँकेकडून कर्ज उचलण्यात आले आहे. नाटय़प्रयोग किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त या ठिकाणी कला ग्रंथसंग्रहालय उभारण्याचीही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मनीषा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दर्जाचे दुसरे सांस्कृतिक केंद्र नाही. त्यामुळे प्रतिष्ठानला विविध कलांच्या आश्रयदात्यांकडून आधार मिळाल्यास कोकणात दर्जेदार सांस्कृतिक कला केंद्र साकारू शकेल. राज्यात अनेक लहान-मोठय़ा सांस्कृतिक संस्था अनुकरणीय उपक्रम करत असतात, पण त्यांची माहिती राज्याच्या अन्य भागांत पोचत नाही. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी खास नियतकालिक सुरू करण्याची प्रतिष्ठानची योजना आहे. तसे झाल्यास राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या निरनिराळ्या सांस्कृतिक उपक्रमांच्या माहितीचे आदान-प्रदान होण्यासाठी संवादाचे व्यासपीठ निर्माण होऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा