लातूर : वातावरण बदलाला अनुकूलन असे अनेक संशोधन शेतीमध्ये होत आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञ यासाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत मात्र हे तंत्रज्ञान त्वरेने शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले .

लातूर येथील गळीत संशोधन केंद्रात सूर्यफूल दिवसाच्या  निमित्ताने ते बोलत होते. व्यासपीठावर गळित संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर  मोहन धुप्पे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे डॉक्टर जय प्रकाश लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे ,संशोधन संचालक डॉक्टर खिजर बेग उपस्थित होते.  डॉक्टर इंद्रमणी म्हणाले संपूर्ण संस्थांना शेतीविषयक संशोधन करण्याच्या सूचना देशातील कृषी विभागाने दिल्या व अनेक विभागांनी यावर संशोधन केले. शेतकरी देवो भव ही भावना कृषी विद्यापीठाने व्यक्त केली आहे.

हवामान बदलाला अनुसरून असे अनेक संशोधन विद्यापीठाने केले आहेत. यांत्रिकीकरणाचा वापर शेतीत व्हायला हवा त्यानुसार वाण विकसित व्हावेत, रोग प्रतिकारक वाण तयार व्हावेत यासाठीही शास्त्रज्ञांनी काळजी घेतली आहे .शास्त्रज्ञ जर बियाणांचा जनक असेल तर शेतकरी हे पालक आहेत. जनक आणि पालक यांचे नाते सुदृढ होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेतीतील संशोधनामुळे आज अनेक ठिकाणी शेतकरी वेगाने काम करत आहेत. मानवत येथील वसंतराव लाड या शेतकऱ्याने 42 एकर करडईची शेती केली.

करडईला काटे असतात त्यामुळे वन्य प्राण्यांपासून बचाव होतो शिवाय यांत्रिकीकरणातून काढणी होत असल्यामुळे खर्चही कमी होतो असे त्या शेतकऱ्याने आपल्याला सांगितले .तीळ, भुईमूग, सूर्यफूल ,जवस असे तेलबियांचे वाण विकसित व्हायला हवेत .यात 40% तेल आहे त्याला प्रोत्साहन देण्याचे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लातूरचे गळीत संशोधन केंद्र हे आपली देशातील वेगळी प्रतिमा बाळगून आहे.येथे झालेले संशोधन शेतकऱ्याच्या बांधावर त्वरेने पोहोचले पाहिजे ती आजची खरी गरज असल्याचे ते म्हणाले.

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर चे शास्त्रज्ञ डॉक्टर जय प्रकाश यांनी आपल्याकडे शास्त्रज्ञ कमी नाहीत, एक वाण तयार करायला किमान 12 ते 13 वर्ष शास्त्रज्ञाना मेहनत घ्यावी लागते. चायना मध्ये संशोधन झाले की थेट ते शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचते व जे संशोधन झाले आहे त्याची 90% अंमलबजावणी शेतीच्या बांधावर होते व तसे निकालही शेतकऱ्याला मिळतात. या उलट आपल्या देशात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचायला कालावधी लागतो.

50%च त्याचे निकाल मिळतात तोपर्यंत संशोधित केलेल्या वाणाची क्षमता संपते आणि नवीन वाण बाजारपेठेत दाखल व्हावी लागते .ही दरी कमी होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पण प्रारंभी गणित संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर मोहन धुप्पे यांनी लातूर येथील संशोधन केंद्रात होत असलेल्या कामाची माहिती दिली. 1956 सालापासून हे संशोधन केंद्र कार्यरत आहे मात्र त्याला पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. यंत्रसामुग्री ही तोकडी आहे त्यासाठी शासनाने मदत करण्याची गरज व्यक्त केली.