लोकसत्ता वार्ताहर
हिंगोली : जिल्ह्याच्या वसमत येथील अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता झाले होते. तब्बल दोन महिन्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी ते घरी परतले. अभियंत्याच्या शोधासाठी कुटुंबियांसह भारताचे तेहरानमधील दूतावास, नवी दिल्ली व मुंबईतील इराणी दूतावासांनी केलेल्या प्रयत्नाचे हे यश आणि प्रार्थनेची फलश्रुती असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथाराज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट करून व्यक्त केली.
वसमतचे अभियंता योगेश पांचाळ ५ डिसेंबर २०२४ रोजी तेहरान येथे पोहोचले होते. मात्र, ७ डिसेंबरपासून त्यांचा अचानक संपर्क तुटला. यामुळे कुटुंबीय चिंतीत होते. कुटुंबीयांनी दिल्ली येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण यांनीही केंद्र शासनाकडे मागणी केली होती. योगेश पांचाळ यांच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नाला यश आले असून, ५ फेब्रुवारी रोजी अभियंता पांचाळ सुखरूप घरी परतले. हे सर्वांच्या प्रयत्नांचे यश असून, प्रार्थनेची फलश्रुती असल्याची पोस्ट खासदार चव्हाण यांनी अपलोड करीत समाधान व्यक्त केले. तसेच पांचाळ कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
अभियंता योगेश पांचाळ यांनी श्री योग ‘एक्सपोर्ट’ नावाच्या कंपनीची नोंदणी केली होती. कंपनीच्या विस्तारासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई येथील काही जणांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांना अशाच प्रकारची कंपनी इराण देशातील तेहरान येथे असून त्या ठिकाणी पाहणी करून येण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याप्रमाणे ५ डिसेंबर२०३४ रोजी योगेश तेहरान येथे पोहोचले होते. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये थांबले. त्यानंतर ७ डिसेंबरपासून त्यांचा अचानक संपर्क तुटला. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते.
तब्बल दोन महिन्यापासून इराणच्या ताब्यात असलेले अभियंता योगेश पांचाळ सुखरूप मायदेशी परत आले. त्याबद्दल योगेश यांच्या कुटुंबियांनी ‘आम्ही ब्रह्म पाहिले’ अशी भावना व्यक्त केली. योगेश यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता मुंबईच्या विमानतळावर आगमन झाले दरम्यान त्यांची पत्नी, मुलगा व भावाने त्यांची गळाभेट घेतली. लेकरू कसे आहे हे त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणालाच माहीत नसते, योगेश दोन महिने इराणच्या ताब्यात असल्याने जीवाचा थरकाप उडाला होता. लेकरू परत येते किंवा नाही? अशी शंका मनात घर करत होती. दोन महिने घरात कोणालाही अन्नगोड लागत नव्हते अशी प्रतिक्रिया योगेशची आई रामकन्या पांचाळ, वडील उत्तमराव पांचाळ यांनी व्यक्त केली.