हीरकमहोत्सव साजरा करणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीताशी संबंधित लघुपट महोत्सव आणि नामवंत कलाकारांशी संवाद साधणारा ‘अंतरंग’ या उपक्रमांबरोबरच गेल्या सहा दशकांतील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी संगीतप्रेमी रसिकांना लाभणार आहे.
ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांना यंदाचा वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. ३५ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.
‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ हे उपक्रम १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत सवाई गंधर्व स्मारक येथे सकाळी साडेदहा वाजल्यापासून होणार आहेत. विविध संकल्पनांवर आणि कलाकारांवर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी संकलित केलेल्या त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन या वेळी आयोजित केले जाणार आहे.
खाँसाहेबांनी लिहिलेल्या काही पत्रांतील मजकूरही पाहण्यास मिळेल. त्यातून त्यांचे सांगीतिक विचार जाणून घेता येतील, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि ‘इंडियन मॅजिक आय’चे श्रीरंग गोडबोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘वॉक थ्रू’ विभागामध्ये पाच भव्य दूरचित्रवाणी संचावरून महोत्सवातील विविध खास छायाचित्रांचे स्मरणयात्रा प्रदर्शन त्याचप्रमाणे पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न मिळाल्यानंतरचे त्यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शन, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर यांना आदरांजली म्हणून भरविलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येईल.
कलाकारांच्या कलेचा चांगल्या प्रकारे रसास्वाद घेता यावा यासाठी महोत्सवात प्रथमच पाच भव्य एलईडी भिंती उभ्या केल्या जाणार आहेत. नेपथ्यकार श्याम भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत भागाची सजावट केली जाणार आहे.
हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त पं. भीमसेन जोशी यांना दीर्घकाळ साथसंगत केलेल्या पुरुषोत्तम वालावलकर, नाना मुळे, तुळशीदास बोरकर आणि माउली टाकळकर या ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सतारवादक पं. अरिवद पारिख आणि ज्येष्ठ गायिका-गुरू उषा चिपलकट्टी यांच्यासह दिवंगत कलाकारांच्या कुटुंबीयांचाही यथोचित गौरव केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा