प्रकाश आंबेडकर प्रमुख असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि वंचित असे चार प्रमुख पक्ष एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. हे चार पक्ष एकत्र आले असले तरी त्यांच्यातील जागावाटपाला अद्याप अंतिम स्वरुप आलेले नाही. ४८ पैकी ४० जागांवर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याच जागावाटपावर आणि किमान समान कार्यक्रमावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही महाविकास आघाडीसमोर आमचा किमान समान कार्यक्रम ठेवलेला आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्राविषयही त्यांनी सविस्तर सांगितले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
इतर पक्षांच्या मसुद्यावर पुढच्या बैठकीत चर्चा
“आतापर्यंत वर्तमानपत्रांत जे वृत्त आलेले आहेत, तेवढीच माहिती आम्हाला समजलेली आहे. ४० जागांवर तोडगा निघालेला आहे. आमच्या शेवटच्या बैठकीत मसुद्यावर चर्चा झाली होती. आम्ही आमचा अंतिम मसुदा महाविकास आघाडीला दिलेला आहे. आता इतर पक्षांचा मसुदा आल्यावर त्यावर पुढच्या बैठकीत चर्चा करायची, हे ठरवण्यात आले,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
वंचितचे महाविकास आघाडीला दोन पर्याय
“आमच्याशी काही अनौपचारिक चर्चाही झाली. यावेळी आम्ही त्यांना दोन पर्याय दिले आहेत. यातला पहिला पर्याय म्हणजे सर्व ४८ जागा त्यांनी वाटू घ्याव्यात. मग आम्हाला ज्या जागांवर लढवायचे आहे, त्या जागांसाठी आम्ही प्रत्येक घटकपक्षांशी बोलतो. हे ठरलेले नसेल तर कोणत्या पक्षाला कोणत्या जागा पाहिजेत त्या आपण एकमेकांना सांगू. ज्या जागांवर एकाच पक्षाचा दावा आहे, त्या जागा बाजूला काढायच्या. जा जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांचा दावा आहे, त्याही जागा बाजूला काढायच्या आणि त्यावर तोडगा काढायचा. तसेच ज्या जागांर तोडगा निघणार नाही त्यासाठी विशेष समिती स्थापन करून तोडगा काढायचा असे प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीला दिलेले आहेत. या दोन्ही प्रस्तावांवर महाविकास आघाडीची काय चर्चा होते, याची आम्ही वाट पाहात आहोत,” असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
तीन्ही पक्षांना दिला ३९ कलमी किमान समान कार्यक्रम
दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी ९ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली होती. राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया अलायन्समधून बाहेर पडल्याने, कॉंग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी इंडिया अलायन्सप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी मला अजूनही आशा आहे. भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.