वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. “आरएसएस-भाजपाच्या १० वर्षांमधील सत्तेचा हिशोब मांडायला सुरुवात केली पाहिजे”, असं म्हणत त्यांनी ३५ हजार कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप केला. ते बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या सांगलीतील ‘सत्ता संपादन सभेत’ बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आरएसएस-भाजपाच्या १० वर्षांमधील सत्तेचा हिशोब मांडायला सुरुवात केली पाहिजे. इथला व्यापारी आणि सरकार यांच्यात संगनमत झालं की, टोमॅटोचा तुटवडा करायचा, त्याचा भाव वाढवायचा आणि निवडणुकीचा खर्च काढून घ्यायचा आणि पुन्हा भाव कोसळवायचा प्रकार झाला. सरकारने या देशात टोमॅटोची तूट निर्माण करून ३५ हजार कोटींची लूट केली आहे.”
“सरकारने टोमॅटोची तूट निर्माण करून ३५ हजार कोटींची लूट केली”
“या देशात टोमॅटोचा तुटवडा करून ३५ हजार कोटींची लूट केली आहे. या विषयावर आम्ही भाजपा-आरएसएसशी चर्चा करायला तयार आहोत. हे लुटारुंचं सरकार आहे. यांना आता मार्गी लावून टाका. यांना पुन्हा सत्तेवर आणण्याची गरज नाही,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“मोदी पत्रकारांना घाबरतात, कारण…”
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी हे लोकशाहीचे नाहीत, तर ठोकशाहीचा पंतप्रधान आहेत. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत ते एकही पत्रकार परिषद घेणार नाहीत. मोदी पत्रकारांसमोर जाऊन उत्तर द्यायला घाबरतात. मोदी पत्रकारांना घाबरतात, कारण पत्रकार त्यांच्यापेक्षा हुशार आहेत. ते असे भित्रे पंतप्रधान आहेत. त्यांची नावालाच फक्त ५६ इंच छाती आहे.”
“मागील १० वर्षात कारगिल युद्धापेक्षा अधिक सैनिक शहीद”
“मागील दहा वर्षात हजारोंच्या संख्येने आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धातही एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. ते भाजपा-आरएसएस सरकारच्या काळात झाले आहेत,” असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
“थू तुमच्या जिंदगानीवर”
भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या नागरिकांच्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “१९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७ हजार ६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख रुपये आहे अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर.”
“…म्हणून १४ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं”
“या मूर्ख नालायक सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाही. आम्हाला आमच्या बापजाद्यांची इभ्रत वाचवायची आहे. म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. भाजपाने या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ आणली आहे. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.
हेही वाचा : सांगलीत वंचितच्या मंचावर टिपू सुलतानची प्रतिमा, भरसभेत पोलिसांना इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले…
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.