२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. पण देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील, असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी केवळ दोन वर्षे पंतप्रधान म्हणून काम करतील, त्यानंतर ते हिमालयात निघून जातील, असंही बोललं जात आहे.
यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसवर जोरदार टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदींना दोन वर्षांनी हिमालयात कशाला पाठवताय, त्यांना आताच हिमालयात पाठवा. देशाचं खूप भलं होईल, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते बीड येथील सभेत बोलत होते.
हेही वाचा- “…एकनाथ शिंदेंचं ‘एन्काऊंटर’ केलं जाणार होतं”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा सत्ता येणार आणि ते फक्त दोन वर्षे पंतप्रधान राहणार, त्यानंतर ते साधू बनून हिमालयात निघून जातील, असा प्रचार सुरू आहे. माझं आरएसएसवाल्यांना आवाहन आहे, तुम्ही दोन वर्षांनी कशाला पाठवताय, तुम्ही आताच मोदींना हिमालयात पाठवून द्या. या देशाचं फार मोठं भलं होईल.” आगामी काळात नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना ‘बापात बाप आणि लेकात लेक’ ठेवणार नाहीत, अशी अवस्था करतील,असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा- “बच्चू कडूंनी सत्तेतून बाहेर पडावं आणि…”, राजू शेट्टींचा महत्त्वाचा सल्ला
काँग्रेसशी युती करण्याबाबत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसला प्रेम (युती या अर्थाने) करण्यासाठी मोदींची परवानगी लागते. त्यांनी परवागनी दिली तरच ते आपल्याशी प्रेम करतील. मोदींनी परवानगी दिली नाही तर ते त्यांच्या मार्गाने आपण आपल्या मार्गाने. उद्या कदाचित आपल्याला आपला मार्ग निवडावा लागणार. कोणतंही युद्ध जिंकायचं असेल तर ते आधी डोक्यात जिंकायचं असतं. उद्याची लढाई आपल्याला जिंकायची असेल, त्यासाठी आरखडा तयार करावा लागेल.