मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून काढलेली पदयात्रा आता नवी मुंबईच्या दिशेने येत आहे. प्रजासत्ताक दिनी ही पदयात्रा मुंबईत धडकेल, असे सांगितले जाते. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊ नयेत, यासाठी सराकारकडून चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. प्रकाश आंबडेकर यांनी सुरुवातीपासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. खुद्द जरांगे यांनीही अनेकवेळा माध्यमांसमोर प्रकाश आंबडेकर यांचा सल्ला आम्ही ऐकतो, असे मान्य केले होते.
प्रकाश आंबडेकरांनी व्यक्त केली भीती
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबडेकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्यासाठी राजकीय प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. यासाठी माझा सल्ला असेल की त्यांनी लोकांच्या पंगतीतच जेवण करावे. त्यांनी वेगळे जेवण केल्यास त्यांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते. पण पंगतीच्या जेवणात मोठ्या प्रमाणात औषध टाकले जाऊ शकत नाही. जर आंदोलनाचे नेतृत्व करणारा व्यक्ती आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्यास आंदोलन भरकटते. त्यामुळे जरांगे पाटील यांनी काळजी घ्यावी.
राज्य सरकारने जरांगे यांच्याशी प्रामाणिकपणे चर्चा करावी. आठवड्याभरात देऊ, महिन्याभरात देऊ, विशेष अधिवेशन घेऊ, असे पोकळ आश्वासन देऊ नयेत. ही आश्वासने म्हणजे चॉकलेट दाखविण्याचा प्रकार आहे. जरांगे पाटील यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि तसा शब्द द्यावा, असेही प्रकाश आंबडेकर म्हणाले. राज्य सरकारची प्रामाणिकता दिसली तर लोकही त्यांचे नक्कीच ऐकतील. मात्र सरकारने फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केल्यास, आंदोलन आणखी तीव्र होईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
हा माकडाचा खेळ सुरू
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यावर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, ओबीसी आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षणासाठी वेगवेगळे ताट द्यावे लागेल. अन्यथा हा प्रश्न आणखी चिघळेल. आरक्षणाचा प्रश्न जिवंत राहण्यासाठी जरांगे पाटील यांना राजकीय भूमिका घ्यावीच लागेल. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर सोपविला असल्याचे मला दिसते. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ओबीसींना गोंजारत आहेत. त्यामुळे हा माकडाचा खेळ सुरू आहे. हे ओबीसींनी ध्यान्यात घ्यायला हवे. भाजपा रामाचे भक्त जरी असले तरी ते ओबीसींचे भक्त नाहीत, हेदेखील ओबीसी समाजाने लक्षात घ्यावे, असेही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.