Prakash Ambedkar Health Condition Update : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रक काढत माहिती दिली. गुरुवारी, ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत वंचितच्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली. ” बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर कुटुंब यावेळी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. त्यामुळे आपणास विनंती आहे की कुटुंबाच्या विनंतीचा आदर करावा कारण ते कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभाग यांच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत”, असंही सांगण्यात आलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. राजकीय पक्षांसह प्रमुख नेते जोमाने तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली. राज्यातील सर्व विभागांमध्ये बहुतांश मतदारसंघांमध्ये वंचितने उमेदवार दिले आहेत. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न केले आहेत. विविध समाज घटकांना त्यांनी वंचितची उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज व छाननीनंतर आता प्रचार मोहीम रंगात येणार आहे. त्यातच आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृती विषयी वृत्त समोर आले.

प्रदेशाध्यक्ष करणार प्रचाराचे नेतृत्व

ऐन विधानसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

m

m

b

b